![]()
दुचाकीवरून जामनेरहून सावळदबारा येथे येत असलेल्या सावळदबारा (ता. सोयगाव) येथील पती- पत्नीचा दुचाकी अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तोरनाळा (जि. जळगाव) परिसरात बुधवारी (२२ एप्रिल) घडली. गोपाळ वासुदेव खडके (३५) व त्यांची पत्नी सोनाली गोपाळ खडके (३०) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, दीड वर्षाची मुलगी मुक्ताई ही किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावली. गोपाळ हे पत्नी सोनाली व मुलगीसह दुचाकीने जामनेरहून सावळदबारा येथे येत होते. दरम्यान, तोरनाळा परिसरात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली. घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथे पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गोपाळ खडके यांच्या पश्चात आजी,आई-वडील, भाऊ- बहीण, काकू, काका तसेच दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत. सहा वर्षीय मुलाने दिला अग्निडाग, उपस्थितांना अश्रू मृतांवर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी १२ वाजता सावळदबारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने आपल्या आई-वडिलांना अग्निडाग दिला. हा हृदयद्रावक क्षण पाहून उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.
Source link
सावळदबारातील दांपत्याचा दुचाकी अपघातामध्ये मृत्यू:जळगाव जिल्ह्यात अपघात; मुलगीही जखमी