![]()
अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या सावळदबारा आणि परिसरात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीलाच समाधानकारक आणि पेरणीलायक पाऊस झाल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक मका व कपाशीच्या पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण उत्कृष्ट झाली असून, सध्या शेतातील कोवळी हिरवीगार रोपे डोलताना दिसत आहेत. यंदा पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्यामुळे सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे कमालीच्या वेगाने पूर्ण केली. वेळेवर झालेली उगवण आणि शेतात सर्वत्र पसरलेली हिरवाई पाहून गेल्या काही वर्षांपासून संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, या पिकाचे अंतिम भवितव्य आणि एकूण उत्पादन हे पुढील दोन ते तीन महिन्यांतील पावसाच्या सातत्यावरच अवलंबून असल्याने, शेतकरी आता चातकासारखी निसर्गाच्या कृपेकडे आशेने डोळे लावून पाहत आहेत. गत काही वर्षांचा अनुभव पाहता शेतीचा खर्च अतोनात वाढला आहे. खते, बी-बियाणे, आणि कीटकनाशके यांचे वाढते दर यामुळे शेतकरी आधीच आर्थिक विळख्यात आहे. त्यातच अनियमित पाऊस, अतिवृष्टी किंवा पावसाचा पडणारा दीर्घ खंड यामुळे अनेकदा सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा जरी सुरुवातीचा काळ अत्यंत आशादायक आणि अनुकूल असला, तरी पुढील काळात पावसाचा योग्य समतोल राहणे उत्पादनवाढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, यंदा पाऊस चांगला राहिल्यास अधिक उत्पादन मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. शेतामधील सोयाबीन बहारात; शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित सोयाबीन पिकाच्या वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर नियमित पाऊस आणि पोषक हवामान मिळाल्यास यंदा उत्पादनात वाढ होऊ शकते. याउलट, ऐन बहराच्या काळात अतिवृष्टी, दीर्घकाळ पावसाचा खंड पडला, तर उत्पादनावर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. सध्या शेतांमध्ये डोलणारी सोयाबीनची हिरवळ शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहे. आतापर्यंत निसर्गाने मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
Source link
सावळदबारा परिसरात सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती:आता शेतकऱ्यांच्या नजरा मोठ्या पावसाकडे, यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा