![]()
शासनाच्या वतीने आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिला. कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुक्यात केवळ १७ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेची झाडाझडती घेतली. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या दालनात जिल्हाधिकारी गौडा यांनी ‘एसआयआर’ कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी केली. तसेच उपस्थित बीएलओ आणि महसूल कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून कामातील अडचणी जाणून घेतल्या व गती वाढवण्याच्या आवश्यक सूचना दिल्या. या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मुंडवाडी येथील आदर्श शेतकरी तेजराव बारगळ यांच्या ‘अंकुर रोपवाटिकेला’ भेट दिली. तेथे अत्याधुनिक पद्धतीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे त्यांनी कौतुक केले. याशिवाय, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देत, त्यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी केले, तर आभार तहसीलदार सारिका भगत यांनी मानले. सांख्यिकीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणेने युद्धपातळीवर काम करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले. कर्मचाऱ्यांचा सत्कार उद्दिष्ट पूर्ण करण्यात तालुका मागे असला, तरी काही कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मतदान केंद्र क्रमांक १८४, २७९ व ३२५ येथे ‘एसआयआर’चे १०० टक्के काम पूर्ण केल्याबद्दल प्रकाश थोरात आणि स्वाती रोकडे या बीएलओंचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Source link
‘एसआयआर'च्या कामात दिरंगाई केल्यास कारवाई:जिल्हाधिकारी गौडा यांचा कर्मचाऱ्यांना इशारा