![]()
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्ती आणि सायकलिंगचा एक अनोखा संगम शुक्रवारी लासलगावात पाहायला मिळाला. लासलगाव सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेली ७ वी पंढरपूर सायकलवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाली. विंचूर रोडवरील श्री दत्त मंदिर येथून सायकलपटूंनी आपल्या ३६० किलोमीटरच्या प्रवासाला प्रारंभ केला. यंदाच्या सायकलवारीचे आकर्षण म्हणजे १५ वर्षांचा अर्णव ठाकरे व ७० वर्षीय विजय वैद्य यांचा सहभाग. वयातील हे अंतर विसरून विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेले हे सायकलपटू प्रेरणादायी ठरत आहेत. वय हा केवळ एक आकडा आहे, व जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. या वारीत अनिल ब्रम्हेचा, तुषार लोणारी, डॉ. अनिल ठाकरे, रियाज शेख, विजय वैद्य, विजय कुंदे, दगू नवले, संजय पाटील, सागर खांबेकर, प्रतिक सूर्यवंशी, प्रदीप गुजराथी, अर्णव ठाकरे, डॉ. उत्तम रायते, अरुण थोरे, अशोक शिंदे, संजय कदम, सुनील ठोंबरे, महेश वर्मा, डॉ. किरण निकम व ऋषिकेश आहेर आदी सहभागी झाले आहेत. युवकांमध्ये फिटनेसची जाणीव हा वारीमागचा मूळ उद्देश गेल्या सात वर्षांपासून क्लब सातत्याने हा उपक्रम राबवत आहे. केवळ धार्मिक भावना जोपासण्यासोबतच सायकलिंगची आवड, निरोगी जीवनशैलीचा प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि युवकांमध्ये फिटनेसची जाणीव निर्माण करणे हा या वारीमागचा मूळ उद्देश आहे. शिस्त, समर्पण, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडवणारी ही वारी आज लासलगावच्या सायकलिंग संस्कृतीची ओळख बनली आहे.
Source link
लासलगाव सायकलिस्ट क्लबची 7 वी वारी पंढरपूरसाठी मार्गस्थ:निरोगी जीवनशैलीचा प्रसार आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती