![]()
या आदिवासीबहुल परिसरामध्ये भात लागवडीच्या ऐन हंगामात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. खत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दिवसभरात कृषी विभागाच्या मध्यस्थीनंतर सहकारी संस्था व खत विक्रेत्यांना ६८३ गोणी खताचे वाटप करण्यात आले असले, तरी परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सहकारी संस्थेत केवळ सभासदांनाच खत दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी खासगी विक्रेत्यांवर अवलंबून आहेत. खासगी दुकानांसमोर शेतकरी पहाटेपासूनच रांगा लावून उभे होते. मात्र, युरिया खतासोबत दुकानदारांनी ‘जड खत’ (लिंक्ड खत) खरेदी करण्याची सक्ती केल्याने आणि पैसे घेऊनही वेळेवर खत न दिल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि दुकानांसमोर मोठा गोंधळ उडाला. खताची एक गोणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे सलग तीन ते चार दिवस वाया जात आहेत. त्यामुळे भात लागवडीच्या ऐन हंगामात सहकारी संस्थेतील ‘बफर स्टॉक’ केवळ सभासदांपुरता मर्यादित न ठेवता, तो सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठीही खुला करावा, अशी मागणी रमेश भोये, रमेश शेंडे, नारायण आसाम, वामन खरपडे, अशोक लांगे, यादव गवळी आदी शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी अधिकारी तातडीने पोहोचले घटनास्थळी शेतकऱ्यांचा संताप पाहून स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ खत विक्री केंद्रांवर धाव घेतली. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे थेट फोनवरून जाब विचारला. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तातडीने हरसुलमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत रांगेतील शेतकऱ्यांना ६८३ खत गोणींचे वितरण करण्यात आले. पहाटेपासून उपाशीपोटी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दुपारनंतर खत मिळाले. दोन दिवसांत ‘इफको युरिया’चा नवा साठा उपलब्ध हरसुलमधील बफर स्टॉक सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्र देऊन मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत हरसुलमध्ये ‘इफको युरिया’चा नवा साठा उपलब्ध होणार आहे. – महेश नागपूरकर , कृषी अधिकारी
Source link
टंचाई कायम:हरसुलला खतांसाठी पहाटेपासून रांगा, बफर स्टॉक सर्वसामान्यांना खुला करण्याची मागणी