![]()
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या दिंडोरी तालुक्यात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम वेगाने सुरू आहे. या मोहिमेची प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि मतदार याद्या शंभर टक्के अचूक करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिंडोरी शहरातील मतदान केंद्रांचा धावता दौरा करत अचानक भेटी दिल्या. तालुक्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहेत. या मोहिमेत बीएलओ कर्मचाऱ्यांकडून मतदारांची पात्रता, पत्ता, फोटो मॅचिंग आणि स्थलांतरित मतदारांची पडताळणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिशूल अग्रवाल यांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संगीता महाजन आणि पर्यवेक्षक विजय देवरे करत असलेल्या कामाची प्रत्यक्ष पडताळणी केली. मतदारांशी संवाद साधून त्यांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिंडोरी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू, नये आणि मतदार यादीत एकही दुबार किंवा मृत मतदाराचे नाव राहू नये, अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ऑनलाइन डेटा मॅपिंग आणि एस आयआर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांसह नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक उपस्थित होते.
Source link
दिंडाेरीतील मतदान केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी:डेटा मॅपिंग व एसआयआर प्रणालीत त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाही जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा