![]()
डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या १५२ भागांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना रोहित पवारांनी ५० लाख रुपयांची, तर आव्हाडांनी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिकेचा टीआरपी कमी असल्याचे कारण पुढे करत वाहिनीकडून निर्मिती खर्चामध्ये तब्बल ५० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव निर्मात्यांसमोर ठेवण्यात आला होता. यामुळे कलाकारांचे मानधन कमी करण्यापासून ते थेट मालिका गुंडाळण्यापर्यंतच्या हालचाली सुरू होत्या. १५ जून रोजी ही मालिका संपणार असल्याचे संकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले होते. आता रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी या मालिकेचा विचार जिवंत ठेवण्यासाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले,”अशा थोर महामानवांचे विचार पुढे नेताना अनेक अडचणी आणल्या जातात, त्यांचे फंडिंग रोखले जाते. ही मालिका लोकांसमोर येऊ नये आणि महात्मा फुलेंचे विचार पोहोचू नयेत, यासाठी अनेक मोठी ताकदवान लोकं प्रयत्न करत आहेत. ही मालिका बघणारे लाखो-करोडो लोक आहेत. ही मालिका जर थांबवली जात असेल, तर तुम्ही समजून घ्या, फक्त मालिका थांबवली जात नाही, तर विचार थांबवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.” मनुवादी विचाराच्या विरोधात महामानव लढले रोहित पवार म्हणाले, “त्या काळात या महामानवांनी परिश्रम घेतले, कष्ट घेतले. एक मनुवादी विचार जो त्या काळामध्ये अशा विचारांना दाबत होता, त्या विचाराच्या विरोधात हे सगळे महामानव लढले, म्हणून आज आपण सर्वजण शिकू शकलो आणि बोलू शकलो, माझी पणजी शिकली, माझी आजी शिकली, माझी आई शिकली, माझी बहीण, माझी पत्नी, आता माझी मुलगी शिकत आहे. हे कोणामुळे असेल तर हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे.” युट्यूबवर मालिका चालवा, आम्ही खंबीर सोबती डॉ. अमोल कोल्हे ही मालिका १५ जूनला संपवणार असल्याचा उल्लेख करत रोहित पवारांनी त्यांना ही मालिका युट्यूब किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सुरू ठेवण्याचे आवाहन केले. “डॉक्टर अमोल कोल्हे ही सेवा मान्य करतील की नाही मला माहित नाही, पण माझ्या परिवाराकडून आणि माझ्या कंपनीकडून आज या ठिकाणी सेवा म्हणून, फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी ५० लाख रुपये तुमच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी जाहीर करतो,” अशी घोषणा रोहित पवारांनी केली. तसेच हा आकडा कमी आहे. मी तुम्हाला सांगतो, यापुढे महाराष्ट्रातून कोणी शंभर रुपये, कोणी पन्नास रुपये, कोणी लाख रुपये देईल आणि कोणी करोड रुपये देईल, पण हा जो विचार आहे, तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत, असेही रोहित पवार म्हणालेत. जितेंद्र आव्हाडांकडूनही १० लाखांची मदत जाहीर रोहित पवारांच्या या मोठ्या घोषणेनंतर मंचावर उपस्थित असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनीही डॉ. अमोल कोल्हे यांच्या या मालिकेला पाठिंबा दिला. रोहित पवारांचे कौतुक करत आव्हाडांनी आपल्या खास शैलीत मोठी घोषणा केली. “रोहित मोठा माणूस आहे, पण माझ्या गरीब खानदानातर्फे मी या कामासाठी १० लाखांची देणगी जाहीर करतो,” असे आव्हाड म्हणाले. एकीकडे टीआरपी आणि बजेट कपातीच्या कात्रीत अडकलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका आता या राजकीय आणि आर्थिक पाठबळानंतर नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Source link
सावित्रीबाई फुलेंच्या मालिकेसाठी रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत:म्हणाले – विचार थांबवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत