Headlines

सीईओ पाटील यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी:आषाढीवारीच्या तयारीचा घेतला आढावा, समन्वयाने काम करण्याच्या सूचना




आषाढीवारीच्या तयारीच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षितता आणि मुलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व संबंधित विभागाने परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हलगर्जीपणा करू नये आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले. श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पालखी मार्गावर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी दौंड, बारामती, इंदापूर येथील जिल्हा परिषद गटनेते, सदस्य व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य उपस्थित होते. त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भूषण जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवटकर, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तसेच ग्रामविकास, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पोलीस, स्वच्छता, नगरपालिका विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यात पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता आणि नियमित क्लोरीनेशनची तपासणी करण्यात आली. हॉटेल, भोजनालये व अन्नविक्री केंद्रांमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. तसेच, धूर फवारणी, डास नियंत्रण आणि संसर्गजन्य आजार प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारी तात्पुरती आरोग्य केंद्रे, आयसीयू सुविधा, जर्मन हँगर, चरणसेवा केंद्रे आणि वैद्यकीय पथकांच्या तयारीची पाहणी करण्यात आली. १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा तसेच एएलएस व बीएलएस रुग्णवाहिकांची उपलब्धता तपासण्यात आली. मुक्कामस्थळी औषधसाठा, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन उपचार व्यवस्थेची तयारीचाही आढावा घेण्यात आला. याव्यतिरिक्त, सार्वजनिक व तात्पुरत्या शौचालयांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विभागनिहाय कृती आराखड्याची अंमलबजावणी तपासण्यात आली. पालखी मार्गावरील रस्त्याची स्थिती, स्वच्छता आणि वारकऱ्यांसाठी उपलब्ध नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *