![]()
चार्टर्ड अकाउंटंट्स क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय), नवी दिल्लीच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘डायरेक्ट टॅक्स कमिटी’च्या (डीटीसी) सदस्यपदी अहिल्यानगरचे सुपुत्र सीए, आयपी अजय मुथा यांची निवड झाली. ही समिती प्रामुख्याने आयसीएआयच्या वतीने भारत सरकारचे अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांना इन्कम टॅक्स आणि कर प्रणालीबाबत अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक सल्ले, तांत्रिक शिफारसी (प्री/पोस्ट बजेट मेमोरॅंडम) देण्याचे कार्य करते. कर सल्लागार अमृतलाल मुथा यांचे सुपुत्र असलेले सीए अजय मुथा नगरमध्ये गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून इन्कम टॅक्स व ऑडिट क्षेत्रात यशस्वीपणे प्रॅक्टिस करत आहेत. सन १९९३ मध्ये सीए इंटरमिडिएट परीक्षेत त्यांनी ‘इन्कम टॅक्स’ या विषयात संपूर्ण भारतात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता. ते आयसीएआयच्या ‘विकासा’ शाखेचे संस्थापक अध्यक्ष, अहमदनगर सीए शाखेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. तसेच अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (शेड्यूल्ड बँक) ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट’चे चेअरमन म्हणून ते जबाबदारी सांभाळत असून, जिल्ह्यातील एकमेव प्रॅक्टीसिंग ‘इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल’ आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलसह अनेक सामाजिक व व्यावसायिक संस्थांमध्ये त्यांचे सक्रिय योगदान आहे. त्यांच्या या गौरवशाली निवडीमुळे अहिल्यानगरला देश पातळीवर मोठा बहुमान मिळाला आहे.
Source link
सीए अजय मुथा यांची नवी दिल्लीच्या "डायरेक्ट टॅक्स कमिटी'वर निवड:अहिल्यानगरला मिळाला राष्ट्रीय पातळीवर मोठा बहुमान