![]()
पुणे जिल्ह्यातील चौफुला-सुपे मार्गावरील सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला आज सकाळी भीषण अपघात झाला. घाट चढताना तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मागे सरकून रस्त्यावर पलटी झाली. या बसमध्ये सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील विद्यार्थी प्रवास करत होते. या दुर्घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जखमी विद्यार्थ्यांवर सर्वोत्तम व तातडीने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी या अपघातावरून एसटी महामंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नेमकी घटना कशी घडली? बारामती आगाराची ‘एमएच २० बीएल ३१२१’ क्रमांकाची एसटी बस आज सकाळी नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन पाटसहून सुप्याच्या दिशेने निघाली होती. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुपे घाटात चढण चढत असताना बस पुढे जाण्याऐवजी अचानक रिव्हर्स (मागे) येऊ लागली. चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र बस काही अंतर मागे घसरत जाऊन थेट रस्त्यावर पलटी झाली. बस पलटी होताच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आरडाओरड आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बसबाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींवर उपचार सुरू; प्रकृती स्थिर घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी पाटस, लोणी काळभोर आणि चौफुला येथील हर्ष हॉस्पिटलसह विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर इजा झालेली नसून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. किरकोळ दुखापत झालेल्या व सुखरूप असलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीनंतर सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रशासनाला निर्देश घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तत्काळ यंत्रणांशी संपर्क साधला. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आणि विद्या प्रतिष्ठानच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. रुग्णालयात दाखल सर्व विद्यार्थ्यांना जलदगतीने आणि सर्वोत्तम उपचार पुरवण्याचे आदेश त्यांनी आरोग्य व पोलीस प्रशासनाला दिले. “सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून पालक आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये,” असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. “नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचले”; रोहित पवारांचा एसटी प्रशासनावर घणाघात या अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे: “विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची एसटी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि एसटी महामंडळाच्या सेवेबाबत चिंता वाटावी अशी आहे. काही विद्यार्थ्यांना लागलेला किरकोळ मार वगळता नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवितास धोका झाला नाही, हे सर्वजण सुखरूप आहेत.” गेल्या आठवड्यातही स्वारगेट ते बारामती मार्गावर दोन बसेस बंद पडल्याचा संदर्भ देत त्यांनी एसटी प्रशासनावर ताशेरे ओढले. “यापूर्वीच्या परिवहन आयुक्तांचा कार्यकाळ स्वच्छ कारभाराऐवजी इतर बाबींमध्येच गेल्यामुळे एसटी महामंडळावर वारंवार ही वेळ येत आहे. प्रशासनाने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि विद्यार्थीच काय, कोणत्याही सामान्य प्रवाशाचा जीव धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, एसटी बसमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, याचा अधिक तपास पोलीस आणि परिवहन विभागाकडून केला जात आहे. ——————— हेही वाचा… 81 वर्षांच्या वर्गमित्राने पंतप्रधानांचे दार ठोठावले अन् भाजप आमदाराची माघार!: वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडला, नरेंद्र मेहतांनी बांधकाम परवानगीही केली सरेंडर मीरा-भाईंदरमधील सुमारे 2,810 चौरस मीटर जमिनीच्या वादाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाळेतील माजी वर्गमित्र असलेले 81 वर्षीय असगर अली वोरा यांनी 8 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांची भेट घेऊन भाईंदर पूर्वेतील आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत हस्तक्षेपाची मागणी केली होती. या भेटीनंतर काही दिवसांतच प्रशासनाने प्रकरणाची दखल घेतली आणि आता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडण्याची तसेच त्या भूखंडासाठी मिळालेली बांधकाम परवानगी सरेंडर करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर वोरा यांच्याविरोधात दाखल केलेली पोलिस तक्रारही मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी कळवले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांची एसटी बस उलटून भीषण अपघात:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे तातडीने उपचारांचे निर्देश, रोहित पवारांचा एसटी कारभारावर निशाणा