![]()
गणेशोत्सवाचे औचित्य साधून वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि ‘गीत फुलोरा’ निर्मित “माझा बाप्पा किती गोड” या नवीन गणेशगीताचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले. अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकल्या स्वर-भाग्यदा हिने आपल्या सुमधुर आवाजात हे गीत गाऊन पार्श्वगायनात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल (रहाटणी, पुणे) च्या प्राचार्या जयश्री व्यंकटरमण यांच्या शुभहस्ते या गाण्याचे लोकार्पण पार पडले. या प्रसंगी बोलताना प्राचार्या व्यंकटरमण यांनी भाग्यदाच्या सूर-तालबद्ध गायनाचे कौतुक करत “आम्हाला भाग्यदाचा खूप अभिमान आहे,” अशा शब्दांत तिची पाठ थोपटली. लोकार्पण सोहळ्यात उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भाग्यदासोबत गाण्यावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. मैत्री आणि संगीताचा सुरेल संगम “बालगणेश सर्वच मुलांना आवडतो. त्याच्याशी शब्द आणि सुरांच्या माध्यमातून लहानांची मैत्री व्हावी, याच उद्देशाने या गणेशोत्सवात या गीताची निर्मिती करण्यात आली आहे,” अशी माहिती गीताचे गीतकार आणि संगीतकार अभय कुलकर्णी व अर्पिता कुलकर्णी यांनी दिली. या गाण्याचे संगीत संयोजन (म्युझिक अरेंजमेंट) बालश्री पुरस्कार प्राप्त अथर्व याने केले असून, ‘गीत फुलोरा रेकॉर्डिंग स्टुडिओ’मध्ये हे गीत ध्वनित करण्यात आले आहे. अभय-अर्पिता, अथर्व आणि भाग्यदा या चौघांच्या विशेष योगदानातून आकारास आलेले हे गीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ताल धरण्यास भाग पाडत आहे. शाळेकडून कौतुकाचा वर्षाव भाग्यदा ही एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असून, एवढ्या लहान वयात संगीतात आणि पार्श्वगायनात तिने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल प्राचार्या जयश्री व्यंकटरमण, मुख्याध्यापिका गीता गर्ग, वर्गशिक्षिका जुई चाळके यांच्यासह संस्थेचे संचालक डी. के. भोसले, वृषाली भोसले, देवयानी भोसले, ऋतुजा भोसले, प्रियंका अग्रहरी, योगेश मिश्रा, कविता शर्मा व थापा सर यांनी भाग्यदाचे विशेष अभिनंदन केले. यापूर्वीही अनेक संगीत अल्बममध्ये आपल्या सुरांचा जादू दाखवणारी स्वर-भाग्यदा हिचे हे नवीन गीत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि “Geetfulora” या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.
Source link
सूर निरागस हो!:दहा वर्षांच्या स्वर-भाग्यदाच्या पार्श्वगायनाने जिंकली मने; पुण्यात "माझा बाप्पा किती गोड" गाण्याचे थाटात लोकार्पण!