काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात २ ते ९ डिसेंबरदरम्यान ‘सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे यंदा २१ वे वर्ष आहे. दुष्काळी भागातील पशुधनासाठी दहा ट्रक चारा पाठवण्यासह
.
सप्ताहाचे निमंत्रक आणि काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव, माजी आमदार मोहन जोशी यांनी शनिवारी (२८ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी (२ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होईल. माजी मंत्री आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
गुरुवारी (३ डिसेंबर) माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दुष्काळी भागातील पशुधनासाठी दहा ट्रक चारा रवाना केला जाईल. माजी मंत्री विश्वजित कदम प्रमुख पाहुणे असतील.
या सप्ताहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष प्रकट मुलाखत होणार आहे. सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा त्यांच्याशी संवाद साधतील.
विविध क्षेत्रांत कामगिरी करणाऱ्या एकल महिलांना ‘सोनिया गांधी स्त्री शक्ती गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाईल. महापालिकेच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, विद्युत आणि उद्यान विभागांतील कर्मचाऱ्यांचाही गौरव होईल.
देवदासी प्रथेतून बाहेर पडून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या महिलांचा सन्मान, महिला बचत गटांचे मेळावे, रोजगार मेळावे आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम होतील. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक साहित्य आणि धान्यवाटपही केले जाईल.
वाढदिवसापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता समाजातील विविध घटकांच्या सेवेसाठी हा सप्ताह आयोजित केला आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.
