![]()
तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव, साठवण तलाव आणि लघु सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याच भीषण टंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी पाझर तलाव खोलीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तलाव कोरडे पडल्याची संधी साधत मुरुमाचा अवैध उपसा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही तलावांच्या थेट संरक्षण भिंतीलगतच उत्खनन करण्यात आल्याने या भिंती कमकुवत झाल्या आहेत. गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूमिश्रित माती थेट वीटभट्ट्यांवर नेऊन तिचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचाही स्थानिकांचा आरोप आहे. संबंधित विभागांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कारवाई झालेली नाही. हसूल विभाग, लघु सिंचन विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाने तात्काळ संयुक्त पाहणी करून सर्व पाझर तलावांचे पंचनामे करावेत. नियमबाह्य उत्खनन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तालुक्यातील जलसाठ्यांनी गाठला तळ लघु सिंचन विभागाच्या सोयगाव शाखेअंतर्गत १८, अजिंठा शाखेअंतर्गत ५ साठवण तलाव व प्रकल्प, तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील सुमारे ९५ पाझर तलावांसह जिल्हा परिषदेच्या अनेक जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. आमखेडा, रावेरी, जरंडी, माळेगाव-पिंपरी, निंबायती, जंगला तांडा, गलवाडा (अ), वेताळवाडी, सोनसवाडी आणि कंक्राळा परिसरातील तलाव कोरडे पडले आहेत.
Source link
सोयगाव येथील पाझर तलाव धोक्यात:खोलीकरणाच्या नावाखाली मुरूम उपसा