![]()
तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांचा महत्त्वाचा, आदर आणि सौभाग्याचा सण म्हणून ओळखली जाणारी ‘वटसावित्री पौर्णिमा’ भावी निमगाव येथे सोमवारी उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या साथीसाठी सुवासिनींनी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा केली. सकाळपासूनच गावागावांतील वडाच्या झाडांनजीक पूजेसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वटपौर्णिमेला भावी निमगावमध्ये ग्रामीण संस्कृतीचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले. गावातील सुवासिनी महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या परिधान केल्या होत्या. नाकात नथ, कपाळावर कुंकू, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक दागिन्यांनी नटलेल्या महिलांच्या उपस्थितीमुळे वडाचा परिसर भक्तीमय आणि मांगल्याने न्हाऊन निघाला होता. श्रद्धा आणि कृतज्ञतेचा भाव ठेवून मनोभावे वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आपल्या पतीबद्दलचा अथांग आदर दिसून येत होता. “पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि अखंड साथ सदैव कायम राहो, तसेच कुटुंबात आरोग्य व भरभराट लाभो, अशी प्रार्थना सुवासिनींनी वटराजाच्या चरणी केली. पतीच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही या पूजेला मोठे महत्त्व असल्याचे ज्येष्ठ महिलांनी सांगितले.
Source link
सौभाग्याचा सण, कृतज्ञतेचा भाव; भावी निमगावात वटपौर्णिमेचा उत्साह