Headlines

स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्या, उदय सामंत यांचे निर्देश:शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत कौशल्य विकास केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार करा




उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधित शेतकरी आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी कौशल्य विकास केंद्र उभारून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे आणि टोयोटा किर्लोस्करसोबत सामंजस्य करार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी सभागृहात उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार विलास भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते. ऑरिक सिटी औद्योगिक वसाहतीत समाविष्ट शेंद्रा व बिडकीन क्षेत्रातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासह काही प्रश्न मार्गी लागले आहेत. याबद्दल शेतकऱ्यांनी मंत्र्यांचे आभार मानले. उर्वरित प्रश्नही लवकरात लवकर निकाली काढले जातील, असे आश्वासन सामंत यांनी शेतकऱ्यांना दिले. सामंत यांनी सांगितले की, शेंद्रा आणि बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येकी दोन एकर क्षेत्र पोलीस स्टेशनसाठी राखीव ठेवावे. स्थानिक रहिवासी आणि प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योगांमध्ये रोजगारात प्राधान्य देणे हेच शासनाचे धोरण आहे. उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी जागतिक दर्जाचे स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र तयार करणे आवश्यक आहे. या कौशल्य विकास केंद्रात टोयोटा-किर्लोस्करच्या सहभागाने डी. एम. आय. डी. सी. चा सहभाग असावा. यासाठी त्यांच्याशी सामंजस्य करार करून स्थानिकांना प्रशिक्षित करून रोजगार संधी देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश सामंत यांनी दिले. तसेच, प्रकल्पबाधित क्षेत्रातील भूमिहीन, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कृषी मजुरी मोबदल्याचा प्रश्न सानुग्रह अनुदान देऊन तात्काळ निकाली काढावा आणि शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत क्रीडा संकुलही डी. एम. आय. सी. ने तयार करावे, असेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *