![]()
हरणबारी व केळझर धरणांतून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने मिळावीत, अशी मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. पाणीवाटपाचा अंतिम निर्णय पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची संनियंत्रण समिती घेणार असल्याने दोन आवर्तने मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही खासदार डॉ. शोभा बच्छाव व आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यंदा दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली असली, तरी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे धरणांतील काही पाणीसाठा चारा पिकांसह रब्बी हंगामातील शेतीसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बागलाण व मालेगाव तालुक्यांतील लाभधारक शेतकऱ्यांनी केली. बैठकीस माजी शिक्षण व आरोग्य सभापती यशवंत पाटील, काँग्रेसचे किशोर कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद भामरे आदी उपस्थित होते. हरणबारी धरणाची क्षमता ५५९ दशलक्ष घनफूट, तर केळझर धरणाची क्षमता १,११४ दशलक्ष घनफूट आहे. हरणबारी धरणातून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात १३२ दशलक्ष घनफूट, तर केळझर धरणातून २६० दशलक्ष घनफूट पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे.
Source link
हरणबारी, केळझरतून आवर्तनांसाठी प्रयत्न:कालवा सल्लागार समिती बैठकीत खासदार व आमदार यांची ग्वाही