Headlines

हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी:स्फोटावर स्फोट होतच राहतील; खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान, आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे म्हणत त्यांनी आगामी काळात आणखी मोठे राजकीय स्फोट होण्याचे संकेत दिले. दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या बंडानंतर आता काही आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखी वाढल्याचे दिसत आहे. ‘स्फोटावर स्फोट होतील’, श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान सहा खासदारांच्या प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “स्फोटावर स्फोट होतच राहतील. गेली चार वर्षे आम्ही फक्त राजकीय धक्केच देत आलो आहोत. ‘ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’.” त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात आणखी काही खासदार, आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधी महायुतीत प्रवेश करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पत्रकारांना मिश्कील शैलीत उत्तर देताना ते म्हणाले, “आजचं पुरेसं नाही का तुमच्यासाठी? आज दोन मोठ्या बातम्या झाल्या. दोन्ही राष्ट्रीय पातळीवरील हेडलाईन्स ठरल्या. एका दिवसात अजून किती बातम्या हव्या आहेत? उद्यासाठी काही ठेवा, परवासाठी ठेवा. सकाळपासून ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावत आहात. तुम्हीही आता थकला असाल. आज थोडी विश्रांती घ्या, उद्या पुन्हा नव्याने सुरुवात करू.” एकनाथ शिंदेंचा ‘6 टायगर्सचा षटकार’ नंदनवन निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सहा खासदारांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “22 जून 2022 रोजी आम्ही बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. तो पहिला टप्पा होता. तेव्हा आम्ही 40 आमदारांचा चौकार मारला होता. आता दुसऱ्या टप्प्यात 6 खासदारांचा षटकार मारला आहे. आज आमच्याकडे एक नव्हे, तर 6 टायगर आहेत,” असे शिंदे म्हणाले. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा करत त्यांनी पक्षाची ताकद वाढल्याचे सांगितले. रामदास कदमांचा दावा; ‘सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही’ या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विधानाने आणखी खळबळ उडाली आहे. त्यांनी दावा केला की, प्रवेशासाठी केवळ सहा नव्हे तर सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार होते. “ये तो झांकी है, और बहोत कुछ बाकी है. आमदार फुटीच्या मार्गावर आहेत. मुंबई महापालिकेतील काही नगरसेवकही संपर्कात आहेत,” असा दावा कदम यांनी केला. पुढे ते म्हणाले, “सातव्या खासदाराचीही सही आहे. मी जबाबदारीने बोलतो आहे. काही जण मंत्रिपदासाठी प्रयत्न करत होते. ते न मिळाल्याने मागे गेले. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला बसलेलेच त्यांना फसवत आहेत.” खासदारांनंतर आता आमदारांमध्येही अस्वस्थता? दरम्यान, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषद मिळून जवळपास 20 आमदार उपस्थित होते. मात्र काही आमदार गैरहजर राहिल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली. संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे चार आमदार बैठकीला अनुपस्थित होते. पक्षाकडून या गैरहजेरीमागे वैयक्तिक कार्यक्रम आणि इतर कारणे असल्याचे सांगण्यात आले असले, तरी खासदारांच्या बंडानंतर झालेली ही गैरहजेरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. राजकीय वर्तुळात आता प्रश्न विचारला जात आहे की, खासदारांनंतर आमदारांमध्येही नाराजी आहे का? उद्धव ठाकरेंचे डॅमेज कंट्रोल मिशन सुरू सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे संघटना मजबूत ठेवण्यासाठी आणि उर्वरित आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे, कार्यकर्त्यांशी संवाद आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा करण्यात आली. खासदारांनी निधी आणि विकासकामांच्या मुद्द्यावर पक्ष सोडल्याचा दावा केला असला, तरी ठाकरे गटाकडून हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठा स्फोट? सहा खासदारांच्या प्रवेशामुळे आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच श्रीकांत शिंदे यांचे “पिक्चर अजून बाकी आहे” हे वक्तव्य, रामदास कदम यांचा आमदार आणि नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा आणि ठाकरे गटातील काही आमदारांची बैठकीतील अनुपस्थिती या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता खरोखरच ‘ऑपरेशन टायगर’चा पुढचा टप्पा सुरू होणार का, की ठाकरे गट हे संकट रोखण्यात यशस्वी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *