Headlines

हिंगोलीत टीनपत्रे काढून दुकान फोडले:चोरट्याने 2.40 लाख रुपये पळविले, सीसीटीव्हीमध्ये कैद; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




हिंगोली शहरातील बांगरनगर भागात टीनपत्रे काढून दुकानात शिरलेल्या चोरटयाने गल्लयातील २.४० लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी ता. ३ पहाटे घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील बांगरनगर भागात वैजनाथ जाधव यांच्या मालकिचे अंबिका ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. नेहमी प्रमाणे वैजनाथ हे गुरुवारी ता. २ रात्री दुकानबंद करून घरी गेले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने दुकानाच्या बाजूला असलेले टीनपत्र बाजूला करून आत प्रवेश केला. डोके व तोंड टोपीने झाकलेल्या चोरट्याने दुकानात येऊन थेट एका ड्रॉव्हरमधून गल्ल्याची चाबी घेतली. त्यानंतर गल्ला उघडून त्यातील २.४० लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरट्याने पळ काढला. दरम्यान, आज सकाळी वैजनाथ यांनी दुकान उघडल्यानंतर पाहणी केली असता गल्ला उघडा असलेला दिसून आला. त्यांनी त्यात पाहणी केली असता त्यातील पैसे पळविल्याचे दिसून आले. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षिरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात एक चोरटा दुकानात आल्याचे दिसून आले. मात्र त्याने टोपी घातलेली व तोंड झाकलेले असल्याने त्याची ओळख पटली नाही. मात्र पोलिसांनी आणखी काही फुटेज तपासणी करून चोरट्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. या प्रकरणी वैजनाथ यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्के पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *