![]()
औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी शिवारात विहीरीच्या पाण्यात बुडून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 13 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील गोविंदनगर भागातील अनिकेत नागेश भालेराव (12) हा वसमत येथे इयत्ता सातवी वर्गात शिक्षण घेतो. परीक्षा संपल्यामुळे तो मार्डी येथे मामाच्या गावाला राहण्यासाठी आला होता. मामाकडे सर्व कुटुंब शेतात काम करण्यासाठी गेले असतांना अनिकेत हा त्याच्या मित्रासोबत मार्डी शिवारातील एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, अनिकेत यास पोहणे येत नसल्याने तो कमी पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. यावेळी तो पाण्यात बुडाला. मात्र काही वेळानंतर त्याच्या मित्रांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडा ओरड करून मदत मागितली पण तोपर्यंत बराच वेळ होऊन गेला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मार्डी येथील गावकरी घटनास्थळी दाखल झाले. तसेच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार दिलीप नाईक, शंकर भिसे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गावकरी व पोलिसांनी पाण्यात गळ टाकून मयत अनिकेत याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. या प्रकरणी निता भालेराव यांनी दिलेल्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार शंकर भिसे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोलीत मामाच्या गावी आलेल्या 12 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू:औंढा नागनाथच्या मार्डी शिवारातील घटना