![]()
हिंगोली शासकीय कामात कसूर करणाऱ्या, विनापरवानगी कार्यालयात उशिरा येणाऱ्या किंवा परस्पर मुख्यालय सोडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चांगलाच दणका दिला आहे. कार्यालयीन शिस्त धाब्यावर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढे थेट निलंबन आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा एका परिपत्रकाद्वारे दिला आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालयांमधील काही अधिकारी व कर्मचारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित न राहणे, उशिरा येण्याबाबत किंवा अनुपस्थितीबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेणे आणि वरिष्ठांची परवानगी न घेताच परस्पर मुख्यालय सोडणे यासारख्या गंभीर बाबी समाविष्ट आहेत. कार्यालयीन शिस्त आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी गुप्ता यांनी तातडीने परिपत्रक काढले असून त्यानुसार कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सक्षम प्राधिकराच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाऊ नये, तसेच कर्तव्य कालावधीत किंवा रजेच्या काळात पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे बजावण्यात आले आहे. विनापरवानगी अनुपस्थित राहणे किंवा मुख्यालय सोडणे ही अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल. अशा कालावधीचे वेतन दिले जाणार नाही, तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. याशिवाय विभाग प्रमुखांनी विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना नोटीस द्यावी, त्यानंतर त्यांच्या खुलाशासह अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा अशा सुचनाही दिल्या आहेत. विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी वारंवार विनापरवानगी गैरहजर राहतील किंवा मुख्यालय सोडतील, त्यांच्या निलंबनाचे व शिस्तभंगविषयक कारवाईचे प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या या कडक भूमिकेमुळे हिंगोली जिल्ह्यातील महसूल व इतर प्रशासकीय विभागांतील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Source link
हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांचा कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका:उशिरा येणाऱ्यांवर आता थेट निलंबनाची कारवाई