Headlines

'NEET'च्या मुद्द्यावर गप्प का? ओमराजे निंबाळकरांनी अखेर मौन सोडले:म्हणाले- ती विद्यार्थ्यांच्या पोटातली आग होती, ज्याला श्रीकांत शिंदेंनी वाचा फोडली




देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळाचे तीव्र पडसाद दिल्लीतील मोठ्या आंदोलनासह संसदेतही उमटलेले पाहायला मिळाले. या गंभीर प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या आरोपावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सातत्याने टीका होत होती. अखेर या टीकेला उत्तर देत निंबाळकर यांनी संसदेतील नेमक्या घडामोडींवर आपले सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. “नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात झालेले आंदोलन ही विद्यार्थ्यांच्या मनातील खदखद आणि पोटातली आग होती, ज्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत योग्य प्रकारे वाचा फोडली,” अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे भरभरून कौतुक केले आहे. ओमराजे निंबाळकर म्हणाले, जेव्हा दिल्लीमध्ये तरुण युवकांचे आंदोलन होत होते, त्या आंदोलनाच्या वेळी आमच्या पक्षातील लोकसभेचे गटनेते श्रीकांत शिंदे यांनी भूमिका मांडताना तरुणांच्या भावना लोकसभेत मांडण्याचे काम केले. दुसरा वक्ता मी होतो, पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी लोकसभेचे कामकाज चालू शकले नाही. त्यामुळे माझी भूमिका मला लोकसभेत मांडता आली नाही. पण निश्चितपणे त्या तरुणांच्या पोटातली ती आग होती, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांची भावना प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, नीट परीक्षा वर्षातून एकदाच असते. MBBS प्रवेशासाठी ती अत्यंत महत्त्वाची असते. आयुष्याला दिशा देणारी ती परीक्षा आहे. अशा परीक्षेत पेपर फुटला म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतले, ज्यांना पेपर चांगला गेला, पण केवळ पेपरफुटीमुळे त्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागले, त्या विद्यार्थ्यांची भावना प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे होते. ती भावना लोकसभेत मांडण्याचे काम श्रीकांत शिंदे यांनी केले. वेळ मिळाला असता तर मी देखील ती भूमिका लोकसभेत मांडली असती. माझ्या संवेदना विद्यार्थ्यांसोबत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जातो. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचार झाला आणि अचानक निवडणुकीतील गैरप्रकारामुळे निवडणूक रद्द झाली तर त्या लोकप्रतिनिधीची मानसिक अवस्था काय होईल? याचा विचार करावा, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले. तसेच निवडणूक पाच वर्षांनी येते. पण, नीटची परीक्षा संपूर्ण आयुष्य ठरवणारी असते. त्यामुळे निश्चितपणे माझ्या संवेदना विद्यार्थ्यांसोबत आहेत, असेही त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पुढे ओमराजे निंबाळकर म्हणाले, केंद्र सरकारने देखील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. त्यांच्या भावना मान्य केल्या. आम्ही भले सत्ताधारी पक्षात आहोत. पण, याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असा होत नाही. उलट सत्तेचा वापर करून लोकांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हीच आमची जबाबदारी आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन, असे आश्वासन निंबाळकरांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *