![]()
पोलिस दलाच्या वतीने तातडीच्या मदतीसाठी सुरु केलेल्या डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने जुलै महिन्यात 1029 जणांना मदत करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. राज्यात पोलिस दलाच्या वतीने 2021 पासून सुरू असलेल्या डायल 112 प्रणालीद्वारे नागरिकांना तातडीची पोलीस मदत उपलब्ध करून दिली जाते. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही सेवा प्रभावीपणे कार्यरत असून पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे प्रतिसादाचा वेग आणि कार्यक्षमता लक्षणीय वाढली आहे. डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर शक्य तितक्या लवकरच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करीत आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागरीकांना मदत मिळणे शक्य झाले आहे. राज्यात आतापर्यंत डायल 112 वर आलेल्या हजारो कॉल्सपैकी महिलांशी संबंधित, अपघात, चोरी, हरवलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आपत्कालीन घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने मदत पुरवली. गरजू नागरिकांना वेळेत मदत मिळाल्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला. दरम्यान, घटनास्थळी तातडीने पोहोचून कारवाई करण्याच्या कामगिरीतही हिंगोली जिल्ह्याने जून महिन्यात राज्यभरात 28 वा क्रमांक मिळविला होता. मात्र त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र कक्ष सुरु करून त्याचा नियमितपणे आढावा घेण्यास सुरवात केली होती. यामध्ये एखाद्या घटनेची पोलिस ठाण्याला कधी माहिती मिळाली, पोलिस यंत्रणा घटनास्थळी कधी पोहोचली, पोलिसांना पोहोचण्यासाठी उशीर का झाला याची माहिती घेऊन जिल्हा पोलिस दल कुठे मागे पडत आहे याची माहिती देत त्याचे नियोजन करून दिले. त्याचा सकारात्म परिणाम जुलै महिन्यात झाला असून जून महिन्यापर्यंत 28 व्या क्रमांकावर असलेल्या हिंगोली जिल्ह्याने थेट राज्यात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात जुलै महिन्यात जिल्हा पोलिस दलाच्या 112 वर 1,029 कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी 308 महिलांना वेळेत मदत करण्यात आली. अपघाताच्या 29 घटनांमध्ये जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. तसेच चोरीचे 54, रोड अपघाताचे 29, बेपत्ता झाल्याच्या 06, ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित 52 आणि इतर 334 प्रकरणांमध्ये त्वरित पोलिसांची मदत पुरविण्यात आली आहे.
Source link
हिंगोली जिल्हा डायल 112 सेवेत राज्यात अव्वल:जुलै महिन्यात 1029 जणांना मिळाली तातडीची मदत