Headlines

हुंड्यासाठी महिला डॉक्टरचा बळी; लग्नानंतर दीड वर्षात संपवले जीवन:फ्लॅट घेण्यासाठी 12 लाखांची मागणी,पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा‎




नवी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १२ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. डॉ. गौरी सुनील चौरे (दळवी) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. २ मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत गौरी यांचे वडील सुनील जबाजी चौरे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती अमित बाबासाहेब दळवी, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला काही दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. डॉ. गौरी आणि अमित दळवी (रा. तपोवन रोड, अहिल्यानगर; सध्या कामोठा, मुंबई) यांचा विवाह २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखाचे गेले. त्यानंतर हे जोडपे मुंबईतील कामोठा येथे स्थायिक झाले. मात्र, तिथे गेल्यावर पती अमितने नवी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १२ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. सासू-सासऱ्यांनीही लग्न साधे केले, आता भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण, असे म्हणत मानसिक छळ सुरू केला. डॉ. गौरी यांनी एका खासगी रुग्णालयात नोकरी सुरू केली होती, मात्र त्यांचा संपूर्ण पगार सासरचे लोक काढून घेत असत. इतकेच नाही तर फेब्रुवारी २०२५ मध्ये लग्नातील त्यांचे सोन्याचे दागिनेही बळजबरीने काढून घेण्यात आले. डॉ.गौरी यांनी झालेला प्रकार तसेच सासरी होणार छळ आपल्या आई-वडिलांना फोनवरून सांगितला.पती अमित हा दारूच्या आहारी जाऊन पैसे मागण्यासाठी तिला मारहाण करत असे. गौरीने वेळोवेळी आपल्या आई-वडिलांना आणि काकांना याबाबत माहिती दिली होती. फेब्रुवारी २०२६ मध्ये गौरीने आपल्या पतीचे इतर मुलींशी अनैतिक संबंध असल्याचे घरच्यांना सांगितले.त्यानंतर गौरी यांच्या आई मुंबईला जाऊन वाद मिटवून आल्या.मात्र तरीही छळ थांबला नाही. २७ एप्रिल रोजी पती अमित गौरी यांना गोरेगावला सोडून नगरला जातो असे सांगून निघून गेला, पण परतलाच नाही. २८ एप्रिल रोजी सासरच्यांनी फोन उचलणे बंद केल्याने गौरी आणि त्यांची आई नगर व मुंबईतील घरी गेल्या, मात्र दोन्ही घरांना कुलूप होते. सासरच्यांनी पाठ फिरवल्याने गौरी खचून गेल्या होत्या. २ मे रोजी सकाळी घरात कोणी नसताना डॉ. गौरी यांनी छताच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. आई शेतातून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. डॉ. गौरी यांनी बीएचएमएसचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे गोरेगाव आणि परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. गुन्हा दाखल, पण आरोपींना अटक नाही मृत गौरीच्या वडिलांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पती अमित बाबासाहेब दळवी, सासू संगीता बाबासाहेब दळवी व सासरे बाबासाहेब हरिभाऊ दळवी यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *