![]()
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 769 शेतकऱ्यांनीच ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) पूर्ण केले आहे. अद्याप 90 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. या कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी गावोगावी लावण्यात आली आहे. आपले नाव पाहण्यासाठी शेतकरी बँका, विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतींमध्ये मोठी गर्दी करत आहेत. यादीत नाव आल्यानंतर ई-केवायसी केल्यावर कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. मात्र, या प्रक्रियेला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाही. नागरिकांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे. दृष्टिक्षेपात कर्जमाफीची आकडेवारी
जिल्ह्यातील समाविष्ट गावे: 1,276
अपलोड केलेली एकूण नावे: 1 लाख 90 हजार 701
सध्याचे पात्र शेतकरी: 1 लाख 5 हजार 128
ई-केवायसी झालेले शेतकरी: 14 हजार 769
ई-केवायसी बाकी असलेले शेतकरी: 90 हजार 359
ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आले आहे त्यांची ई – केवायसी यशस्वी झाल्यास थेट कर्ज खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी असेल तरच मिळेल कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यात कागदपत्रांची पडताळणी अद्याप सुरू आहे. आगामी काळात पात्र लाभार्थींच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते अशी माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्नीकरण व प्रमाणीकरणासोबतच अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही अत्यंत महत्त्वाची अट आहे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ या प्रक्रिया पूर्ण कराव्यात. ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया शासनाकडून पूर्णतः विनामूल्य (मोफत) करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘सीएससी’ केंद्रचालकांनी शेतकऱ्यांकडून ई-केवायसीसाठी कोणतेही शुल्क आकारू नये. शुल्क आकारणी करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कोणी शुल्क आकारत असेल तर शेतकऱ्यांनी तक्रार करावी. – विनय गौडा, जिल्हाधिकारी, छ.संभाजीनगर आधार कार्ड, बचत खात्याचे पासबुक आवश्यक पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि सहायक निबंधक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीत नाव असल्याची खात्री झाल्यानंतर जवळच्या ‘आपले सरकार’ किंवा ‘सीएससी’ केंद्रावर जावे. आधार कार्ड आणि बँक बचत खात्याचे पासबुक सोबत नेणे आवश्यक आहे. तेथे अंगठ्याचे प्रमाणीकरण करून ई-केवायसी पूर्ण करता येईल.
Source link
1 लाख शेतकरी पात्र, ई-केवायसीमुळे 90 हजार जणांची कर्जमाफी टांगणीला:आधार प्रमाणीकरणाविना अडकणार लाभ; ई-केवायसीसाठी लागणार नाही पैसे