![]()
पुण्यात गुंतवणुकीवर वार्षिक १० ते २५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून तीन गुंतवणूकदारांची २ कोटी ६२ लाख ९३ हजार ५३७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ‘टेक्रूट ३ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या आयटी कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक कमल शर्मा याच्याविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निगडी येथील रहिवासी किशोर बापुराव गोरडे (वय ६३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते एका खाजगी कंपनीत सेल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. २०२२ मध्ये इंटरनेटवर गुंतवणुकीच्या संधी शोधत असताना त्यांची ओळख आरोपी कार्तिक शर्माशी झाली. शर्माने स्वतःची कंपनी आयटी कंपन्यांना भरती सेवा पुरवत असून अमेरिकेतही व्यवसाय करत असल्याचा दावा केला. कार्तिकने कंपनीत गुंतवणूक केल्यास १० ते २५ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवून गोरडे नवीन भागीदारी कंपनीत ५५ टक्के हिस्सेदार बनण्यास तयार झाले. कंपनीचा खर्च आणि उपकरणे खरेदीच्या नावाखाली आरोपीने वेळोवेळी पैशांची मागणी केली. गोरडे यांनी मे ते ऑगस्ट २०२३ दरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यांत एकूण १ कोटी ३० लाख ५८ हजार ४० रुपये जमा केले. हे पैसे भागीदारी कंपनीच्या खात्यात नसून कार्तिकच्या वैयक्तिक कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचे नंतर समोर आले. गोरडे यांनी परतावा व हिशोब मागितला असता आरोपीने टाळाटाळ केली. तपासादरम्यान, आरोपीने नीरज श्रीकांत आंबीकर यांच्याकडून १ कोटी २७ लाख ३५ हजार ४९७ रुपये आणि साहिल हंसराज झालारिया यांच्याकडून ५ लाख रुपये गुंतवणूक म्हणून उकळल्याचे समोर आले. अशा प्रकारे आरोपीने तिन्ही गुंतवणूकदारांची एकूण २ कोटी ६२ लाख ९३ हजार ५३७ रुपयांची फसवणूक केली. विमानतळ पोलिसांनी कार्तिक शर्माविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९, ४२० आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात असून पोलिस आरोपीच्या वित्तीय व्यवहारांची चौकशी करत आहेत.
Source link
10 ते 25 टक्के परताव्याचे आमिष:2.63 कोटींची फसवणूक; आयटी कंपनीच्या सीईओविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल