Headlines

15 वर्षांपासून बंद नॅशनल हेवी पुन्हा सुरू होणार:तळेगाव दाभाडेत 110 एकरांवर यंत्रनिर्मिती प्रकल्प; डिसेंबर 2027 पर्यंत बॉयलर उत्पादनाचे उद्दिष्ट, अमित शाह यांची घोषणा




तळेगाव दाभाडे येथील १५ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या जागेवर ११० एकरांत यंत्रनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत साखर कारखान्यांसाठी बॉयलर उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी ही माहिती दिली. या प्रकल्पात साखर कारखान्यांसाठी बॉयलर, इथेनॉल संयंत्रे आणि कंटेनर तयार केले जाणार आहेत. विविध सहकारी संस्थांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. देशातच यंत्रसामग्री तयार झाल्यास आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे शाह म्हणाले. शाह यांनी सांगितले की, केंद्र सरकार सहकार क्षेत्राला साखर कारखाने, दूध संघ आणि पतसंस्थांपुरते मर्यादित न ठेवता उद्योगांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सहकार चळवळ रुजली आहे. मात्र, स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन होण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मंत्रालय स्थापन करून सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली, असे ते म्हणाले. सहकारी साखर कारखान्यांना करसवलती देण्यासह त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचेही शाह यांनी सांगितले. नॅशनल हेवीची ११० एकर जागा वापराविना पडून राहण्याऐवजी तिचे औद्योगिक केंद्रात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकाराला डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्याबाबत बोलताना शाह यांनी भारत टॅक्सीचा उल्लेख केला. या सेवेत वाहनचालकांना केवळ सेवा देणारे न ठेवता मालकी आणि भागीदारीचा लाभ देण्याची संकल्पना आहे. खासगी टॅक्सी कंपन्यांच्या कमिशन पद्धतीला पर्याय देऊन चालकांना त्यांच्या उत्पन्नाचा अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. ही सेवा पुण्यात सुरू होत असून, पुढे कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही विस्तार करण्याचे नियोजन आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहकार क्षेत्रातील बदलांचा उल्लेख केला. देशात आठ लाख, तर महाराष्ट्रात सुमारे दोन लाख सहकारी सोसायट्या आहेत. राज्यातील १२५ साखर कारखान्यांपैकी १२२ सुरू आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासोबत नव्या उद्योगांना चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *