Headlines

उद्धव आणि राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई करणार का?:प्रकाश आंबेडकरांचा सवाल; छटपूजेवरून भाषिक द्वेष पसरवणारे 'देशविरोधी' असल्याचा घणाघात




मुंबईमध्ये छटपूजेला यापूर्वीही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. ‘छटपूजा मुंबईत का?’ असा त्या विरोधाचा सूर होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही छटपूजेला विरोध केला आहे. मात्र, आता या विरोधाची व्याप्ती वाढली असून हा विरोध भाषेच्या आधारावर केला जात आहे. भाषा हीसुद्धा एक प्रकारची सब नॅशनॅलिटी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भावनिक मुद्द्यांच्या आधारे भाषेचा प्रश्न उपस्थित केला जात असून त्यातून भाषिक द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे. भाषेच्या आधारावर जगभरात अनेक राज्ये आणि देशांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे भाषेच्या नावाखाली द्वेषाची ठिणगी पाडणाऱ्यांना मी देशविरोधी मानतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कारवाई होणार आहे की नाही, याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भाजपने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कारवाई केली तरच सरकार खरोखर कारवाई करत आहे, असे मी मानेन. मात्र, भाजपने कारवाई केली नाही, तर स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी या दोन्ही नेत्यांचा वापर केला जात आहे, असे स्पष्ट होईल, असे आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी मांडलेल्या कॉर्पोरेटच्या वर्चस्वाच्या मुद्द्याचाही संदर्भ दिला. देशात ज्या पद्धतीने कॉर्पोरेट व्यवस्था उभी केली जात आहे, त्यातून देशाचे विघटन होण्याची शक्यता असून उद्याचे राज्य हे लोकशाही व्यवस्थेऐवजी कॉर्पोरेटच्या नियंत्रणाखालील राज्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजप उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कारवाई करत नसेल, तर कॉर्पोरेटचे वर्चस्व निर्माण करण्याच्या मोठ्या राजकीय योजनेचा हा एक भाग आहे, असे मला वाटते. राज्याच्या जागी कॉर्पोरेटचे जग उभे करण्याचा भाजपचा डाव पुढे नेण्यासाठी या दोन्ही नेत्यांचा वापर केला जात आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सावध राहावे, असा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *