![]()
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED मध्ये ॲडिशनल डायरेक्टर आणि जॉईंट डायरेक्टर या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या भरतीचा संदर्भ देत त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून केंद्र सरकारच्या आगामी राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधकांवर नवं धाडसत्र सुरू होणार? रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर करत या भरती प्रक्रियेमागील राजकीय हेतूवर थेट बोट ठेवले आहे. ED ने ‘ॲडिशनल डायरेक्टर’ आणि ‘जॉईंट डायरेक्टर’ यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, “या भरतीचा सरळ अर्थ असा आहे की, देशात दररोज वाढणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी लवकरच मोठे धाडसत्र सुरू होणार आहे.” तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा सरकारचा हा नवा डाव असल्याचे त्यांनी सुचवले आहे. ‘डिलिमिटेशन’ विधेयकाचा संदर्भ या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी संसदेतील एका अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाचाही उल्लेख केला आहे. “संसदेत पडलेलं डिलिमिटेशन (Delimitation – परिसीमन) विधेयक पुन्हा एकदा मंजूर करून घेण्यासाठी विरोधकांवर दबाव आणला जाईल,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तपास यंत्रणांचा बडगा दाखवून राजकीय विरोधकांना जेरीस आणायचे आणि स्वतःच्या फायद्याचे कायदे संमत करून घ्यायचे, अशी सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचा थेट आरोप त्यांनी यातून केला आहे. ‘पुन्हा येण्यासाठी’ची पूर्वतयारी राज्याच्या राजकारणात ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा अत्यंत गाजली होती. याच घोषणेचा संदर्भ देत रोहित पवार यांनी भाजपवर टोला लगावला आहे. ED मधील या मोठ्या भरतीकडे बोट दाखवत, “२०२९ मध्ये ‘पुन्हा येण्यासाठी’चीच ही पूर्वतयारी नाही ना?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले असून, सत्ताधारी पक्ष यावर काय प्रत्युत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा.. भंडाऱ्यात भीषण अपघात: ट्रक-पिकअपच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश भंडारा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक येथील एका ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश आहे. सविस्तर वाचा
Source link
2029 मध्ये ‘पुन्हा येण्यासाठी’ ही पूर्वतयारी तर नाही ना?:ED च्या नव्या भरतीवरून रोहित पवारांचा भाजपला टोला