Headlines

25 मे रोजी अमरावतीत शून्य सावली दिवस:दुपारी काही सेकंदांसाठी सावली अदृश्य होणार




येत्या २५ मे रोजी अमरावतीत ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता येणार आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत सुमारे ५२ सेकंदांसाठी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल. हा कोणताही चमत्कार नसून एक खगोलीय घटना आहे, जी अमरावतीकरांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ आणि रोमांचक खगोलीय घटना आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर काही अंशांनी कललेली असल्याने आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने, सूर्य वर्षभरात उत्तरेकडे (उत्तरायण) आणि दक्षिणेकडे (दक्षिणायन) सरकल्यासारखा दिसतो. ही घटना केवळ कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान येणाऱ्या भूभागांवरच अनुभवायला मिळते. भारताचा दक्षिण आणि मध्य भाग या दोन्ही वृत्तांच्यामध्ये येतो, त्यामुळे येथे शून्य सावली दिसून येते. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर येतो, तेव्हा आपली सावली सरळ पायाखाली पडते आणि ती काही क्षणांसाठी गायब झाल्यासारखी वाटते. अमरावतीतील खगोलप्रेमींनी या अनुभवासाठी तयारी केली आहे. सामान्य नागरिकही हा अनुभव घेऊ शकतात. मराठी विज्ञान परिषदेचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी आवाहन केले आहे की, दुपारी १२ ते १२.३० या वेळेत ५२ सेकंदांसाठी घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा छतावर उभे राहून हा अनुभव घ्यावा. अधिक माहितीसाठी ९६३७३८४८१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. हा रोमांचकारी प्रसंग वर्षातून दोनदा येतो. मे महिन्यातील या घटनेनंतर दुसरी घटना साधारणतः १७ किंवा १८ जुलै रोजी दुपारी १२.२० ते १२.३५ या वेळेत अनुभवता येणार आहे. यावेळी सूर्य ठराविक अक्षांशावर असणाऱ्या शहरांमध्ये स्थानिक वेळेनुसार बरोबर डोक्यावर येईल. सूर्यकिरणे अगदी सरळ (लंबवत) पडल्यामुळे कोणत्याही उभ्या वस्तूची किंवा व्यक्तीची सावली तिरपी न पडता थेट पायाखाली पडेल, ज्यामुळे काही सेकंदांसाठी सावली पूर्णपणे नाहीशी झाल्याचा भास होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *