Headlines

पिंपळोद: बोर्डी नदीवरील पूल, रखडलेल्या रस्त्यांसाठी:पालकमंत्र्यांना साकडे, जीवघेणा प्रवास थांबवण्याची मागणी




पिंपळोद गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पांदण रस्ते, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी कौस्तुभ पाटील घोम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, पिंपळोद गावातील सुमारे ७० टक्के शेती बोर्डी नदीच्या पलीकडे आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत नदीला २५ ते ३० फूट खोल पाणी असते. अशा धोकादायक परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि गुराढोरांना आपला जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते. यापूर्वी नदी ओलांडताना अनेक जनावरांना जीव गमवावा लागला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात उपोषणही केले होते. ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंचांनी शासन स्तरावर या कामांसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यामुळे काही रस्ते मंजूर झाले असले, तरी त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पिंपळोद परिसरातील पांदण रस्त्याचे ७९० मीटर काम मंजूर झाले आहे, परंतु ते कुटासा गावापर्यंत पूर्ण करून तात्काळ सुरू करण्याची मागणी आहे. याशिवाय, पिंपळोद ते गायचारा, पिंपळोद ते अंतरगाव, पिंपळोद ते वडनेर रस्ता आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची रखडलेली कामे लवकरात लवकर मंजूर करून सुरू करावीत, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बोर्डी नदीवर तात्काळ पूल मंजूर करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात निवेदनकर्ते बबन पाटील पटांगे म्हणाले, “पावसाळ्याचे चार महिने पिंपळोदच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण ठरतात. शेतात जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने वृद्ध शेतकरी आणि मजुरांना ३० फूट खोल नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. पालकमंत्र्यांनी या संवेदनशील विषयाची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *