Headlines

तलाठ्याला 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक:माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा भाचा एसीबीच्या जाळ्यात




पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई केली आहे. मुळशी तालुक्यातील माण गावचा तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला तलाठी हा पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाचा असल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार उताऱ्यावर तक्रारदार आणि त्यांच्या भावाचे नाव लावण्यासाठी ही लाच मागण्यात आली. बहीण आणि भावामध्ये हक्कसोड पत्र झाल्यानंतर त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी राणे याने एकूण १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. राणे याने यापूर्वीच १ लाख रुपये स्वीकारले होते आणि उर्वरित २५ हजार रुपयांसाठी तक्रारदाराकडे तगादा लावला होता. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, राणे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी माण येथील तलाठी कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी २५ हजार रुपये स्वीकारताना संतोष राणे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एसीबीने ही कारवाई केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *