![]()
वसईतील प्रसिद्ध उद्योजक मोहनसिंग परमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी मोठी कारवाई करत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार असलेला ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीचा अध्यक्ष सागर भानुशाली याच्यासह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परमार यांच्याकडून घेतलेले तब्बल 32 कोटी रुपये परत करावे लागू नयेत आणि कंपनीवर आपलाच पूर्ण ताबा राहावा, या उद्देशाने भानुशालीने हा हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर भानुशाली हा ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीचा अध्यक्ष असून, जखमी मोहनसिंग परमार हे याच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. इराण-इस्रायल संघर्षामुळे अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीचा मोठा फटका सागर भानुशालीला बसला होता. या आर्थिक संकटामुळे त्याला प्रचंड नुकसान सोसावे लागले आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या संपूर्ण घटनेचा थेट फटका कंपनीच्या शेअर्सलाही बसला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ‘जीएसएम फॉइल्स’चा शेअर 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 192 रुपयांवर बंद झाला. मात्र, गुंतवणूकदारांना आश्वस्त करताना कंपनीने एनएसईला अधिकृत माहिती दिली आहे की, “कंपनीच्या कामकाजात सातत्य राखण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापनाने आवश्यक पावले उचलली असून, वसई आणि अहमदाबाद येथील उत्पादन प्रकल्प सुरळीतपणे सुरू आहेत.” पिस्तूल जॅम झाल्याने थोडक्यात बचावले प्राण वसई (पूर्व) येथील नवजीवन परिसरातील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 24 जुलै रोजी कंपनीच्या आवारात मोहनसिंग परमार यांच्यावर हा थरारक प्राणघातक हल्ला झाला. मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी परमार यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर थेट गोळीबार केला, ज्यातील पहिली गोळी त्यांच्या खांद्याला लागली. त्यानंतर हल्लेखोराने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने पिस्तूल जॅम झाल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला, मात्र घटनास्थळावरून पसार होण्यापूर्वी आरोपींनी बंदुकीच्या मुठीने परमार यांच्यावर जोरदार प्रहार करून त्यांना जखमी केले. भानुशालीला उत्तर प्रदेशातून बेड्या पोलिसांच्या सखोल तपासात या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार सागर भानुशाली असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गुप्तचरांच्या माहितीवरून वालीव पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील ‘स्पेशल टास्क फोर्स’च्या मदतीने भानुशालीला थेट उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या. या कारवाईनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत, त्याच्या इतर सहा साथीदारांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून शिताफीने ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती याबाबत धक्कादायक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भानुशालीने परमार यांना संपवण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. ज्यापैकी 5 लाख रुपये अॅडव्हान्स रक्कम म्हणून आधीच देण्यात आले होते. दरम्यान, या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या मोहनसिंग परमार यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती डॉक्टर आणि पोलिसांनी दिली आहे.
Source link
32 कोटी बुडवण्यासाठी रचला हत्येचा कट!:पिस्तूल जॅम झाल्याने बचावले प्राण, कंपनीच्या अध्यक्षानेच दिली होती 30 लाखांची सुपारी