![]()
मराठवाड्यातील भीषण पाणीटंचाई, शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना वाटण्यात आलेल्या गाड्या, निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद, आणि एमपीएससी (MPSC) पेपरफुटी यांसारख्या विविध मुद्द्यांवरून विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. शिंदे गटात केवळ गुत्तेदार आणि स्वार्थी मंडळी भरली असून टक्केवारीच्या पैशांतूनच गाड्या वाटल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, आधी मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ३२ हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले, याचे उत्तर द्यावे आणि मगच नव्या घोषणा कराव्यात, असे आव्हान दानवे यांनी दिले. ‘टक्केवारीच्या पैशांतूनच गाड्यांचे वाटप’ नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखांना ‘बोलेरो’ गाड्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला. “हे वाटप टक्केवारीतून कमवलेल्या पैशांतूनच होत असावे. टक्केवारीशिवाय शिंदे गटाचे दुसरे कामच काय? तिथे मूळ कार्यकर्ता कुठे आहे? त्यांच्या पक्षात केवळ कॉन्ट्रॅक्टर, गुत्तेदार आणि स्वार्थी मंडळी घुसलेली आहेत,” अशी टीका त्यांनी केली. ३२ हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? राज्यातील दुष्काळ आणि नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले. “गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास साडे बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते आणि त्याचा पहिला टप्पा दिवाळीत मिळेल असे सांगितले होते. मात्र, तो टप्पा अद्याप मिळालेला नाही. आधी त्याचे उत्तर द्यावे आणि मगच दुष्काळाच्या नव्या घोषणा कराव्यात,” असे दानवे म्हणाले. ‘ऑक्टोबर ते मे महिना कसा जाणार?’ मराठवाड्यातील भीषण पाणीटंचाईवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “सप्टेंबर महिन्यातच मराठवाड्यात १७१ पाण्याचे टँकर सुरू आहेत. धरणांमध्ये जेमतेम ३० ते ४० टक्के पाणीसाठा उरला आहे. सिंचनाचे पाणी थांबवले तरी पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा थांबवता येणार नाही. ऑक्टोबरपासून पुढील आठ महिने कसे जातील, या विचाराने अंगावर शहारे येतात. ‘एल निनो’चा धोका आधीच माहीत असूनही सरकारने यातून कोणतेही शहाणपण घेतलेले नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग आता भाजपची ‘ब्रांच’ निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाच्या वृत्तावर भाष्य करताना दानवे यांनी आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “निवडणूक आयोगाचे कार्यालय आता खरंतर भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्येच असायला हवे. निवडणूक आयोग आता भाजपची एक ‘ब्रांच’ (शाखा) झाली आहे. अधिकाऱ्यांनी काही ऐकले नसेल, म्हणूनच मुख्य निवडणूक आयुक्तांनी आक्षेप नोंदवला असू शकतो,” असे ते म्हणाले. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी एमपीएससीच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या आक्रोशाला दानवे यांनी पाठिंबा दिला. निष्क्रिय अध्यक्षांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखालील समितीचे त्यांनी कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण सूचना समितीसमोर ठेवल्या आहेत. व्ही. राधा या संवेदनशील अधिकारी असून, त्यांनी या सूचना स्वीकारल्यास एमपीएससीमधील अनागोंदी नक्कीच थांबेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘नोटिसा मंत्र्यांना का देत नाही?’ मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना प्राप्तिकर विभागाकडून (इन्कम टॅक्स) आलेल्या नोटिशीवरही त्यांनी सरकारला सुनावले. “जाणीवपूर्वक जरांगे पाटलांच्या जवळचे म्हणून जर नोटीस पाठवली जात असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. चौकशी करायचीच असेल, तर इथल्या राज्याच्या मंत्र्यांपासून सुरुवात करा. भ्रष्ट मार्गाने एवढी संपत्ती या मंत्र्यांकडे कुठून आली? त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा का दिल्या जात नाहीत?” असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. ————- ही बातमी पण वाचा.. फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर: लातूरमध्ये 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ! पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून सरसकट मदतीचे आश्वासन, म्हणाले- पंचनामे कायदा म्हणून करावे लागतात राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या जाऊ गावात पोहचलेत. आता रब्बीसाठी शक्य ती मदत करू, बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले. सविस्तर वाचा
Source link
32 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं?:नव्या घोषणा करण्याआधी उत्तर द्या, अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल