![]()
एका 50 वर्षीय नराधमाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे घडली आहे. पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पुण्याच्या नसरापूर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत असताना भंडारा जिल्ह्यातील घटना समोर आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, गत डिसेंबर महिन्यात ही घटना घडली. पण ती आता समोर आली. रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते (50) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी आरोपीच्या घराशेजारीच राहते. ती भाजी आणण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने चिमुरडीवर जबरदस्ती अत्याचार केला. तसेच घटनेची माहिती कुणाला सांगितली तर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या भीतीमुळे पीडितेने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. तिने अनेक महिने हे दुःख स्वतःच्या मनात दडवून ठेवले. पण गत काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीत बदल जाणवू लागला. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती 4 महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने झाला प्रकार सांगितला. यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ लाखणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी रतनलाल कुळमते याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला बेड्या ठोकल्या. पुण्याच्या सोरतापवाडी परिसरातही अत्याचार दुसरीकडे, पुण्याच्या हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसातील एक अल्पवयीन मुलीवर दोन आरोपींनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी सोरतापवाडी येथील एका नर्सरीत काम करते. आरोपी आकाश रामहरी ओव्हाळ व अभिजित खंडागळे हे गरत काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होते. तिची छेड काढत होते. ती नर्सरीत काम करत असताना आरोपींनी तिला गाठले आणि एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने या घटनेची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
Source link
50 वर्षीय नराधमाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर; भंडाऱ्याच्या लाखनी येथील संतापजनक घटना