Headlines

ताडोबातील वाघांच्या संरक्षणासाठी 2300 भटक्या कुत्र्यांची नसबंदी:वनविभागाचे 'मिशन व्हॅक्सिनेशन'; संसर्गजन्य रोगांचा धोका टाळला




ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी वन विभागाने एक महत्त्वाची मोहीम यशस्वी केली आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांमुळे वन्यजीवांना ‘कॅनाईन डिस्टेंपर’ आणि ‘रेबीज’ सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. हा धोका कमी करण्यासाठी २०२५-२६ या वर्षात तब्बल २,३६५ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ताडोबाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात सध्या ९० पेक्षा जास्त वाघ वास्तव्यास आहेत. व्याघ्र संवर्धनामुळे वाघांची संख्या वाढत असली तरी, वनक्षेत्रालगतच्या ९५ गावांमधील भटक्या कुत्र्यांचा वन्यजीवांशी संपर्क येतो. हे कुत्रे अनेकदा वन्यप्राण्यांवर हल्ले करतात, ज्यामुळे त्यांना संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता वाढते. हे संकट टाळण्यासाठी ‘पीपल फॉर ॲनिमल्स’ (वर्धा) आणि ‘वाइल्ड सीईआर’ यांच्या मदतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली. दररोज सूर्योदयापासून कुत्र्यांना जाळ्यांच्या सहाय्याने पकडून निर्बिजीकरण केंद्रात आणले गेले. केवळ निरोगी आणि पात्र कुत्र्यांवरच शस्त्रक्रिया करण्यात आली, तर पिल्ले, वृद्ध आणि आजारी कुत्र्यांना यातून वगळण्यात आले. या मोहिमेअंतर्गत कुत्र्यांना केवळ रेबीजच नव्हे, तर कॅनाईन डिस्टेंपर, पार्वो व्हायरस आणि त्वचारोगावरही औषधोपचार करण्यात आले. पूर्णपणे बरे झाल्यानंतर कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यात आले. या मोहिमेमुळे २,३६५ कुत्र्यांचे यशस्वी लसीकरण आणि १,९४५ हून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे, ज्यामुळे वन्यजीवांना जीवघेण्या रोगांपासून संरक्षण मिळाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *