Headlines

सवना येथील ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित:घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी घेतली होती अडीच हजाराची लाच




सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडलेल्या ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यास अवघ्या चोविस तासात तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी ता. 14 सायंकाळी काढले आहेत. सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला मंजूर झालेल्या घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याने लाभार्थ्याकडे 5 हजाराची मागणी केली होती. मात्र त्यानंतर अडीच हजारात तडजोड झाली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत यांच्या पथकाने त्यास गोरेगाव येथील गोरेगाव चौफुली वर बुधवारी ता. 13 लाच घेतांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा अहवाल जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांनी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे सादर केला होता. यामध्ये लाच घेणे तसेच पाणी टंचाई सारख्या महत्वाच्या बैठकीस गैरहजर राहण्याचा ठपका ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याच्यावर ठेवण्यात आला होता. या अहवालावरून ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहेत. घटना घडल्यानंतर अवघ्या चोविस तासात ग्रामसेवकाचे निलंबन झाल्याने ग्रामसेवक संघटनेतून एकच खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *