Headlines

अल्पवयीन मुलीला धमकावणारा विधीसंघर्षग्रस्त बालक आसाममधून ताब्यात:जलालखेडा पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे केली कारवाई




जलालखेडा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीला मोबाईलवरून अश्लील मेसेज पाठवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला आसाममधून ताब्यात घेतले आहे. कोणत्याही ठोस माहितीशिवाय केवळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. जलालखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीने तक्रार दिली होती की, एक अनोळखी व्यक्ती तिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवत होता. ‘तू माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुला जीवे ठार मारीन,’ अशी धमकी देऊन तो तिचा मानसिक छळ करत होता. या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी २३ जानेवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. तपासाचे पहिले मोठे आव्हान म्हणजे आरोपी पूर्णपणे अनोळखी होता. मात्र, जलालखेडा पोलिसांनी सायबर पोलीस स्टेशन, नागपूर ग्रामीण यांच्या मदतीने तांत्रिक तपासाला सुरुवात केली. व्हॉट्सॲप चॅट्स आणि मोबाईल लोकेशनचे सखोल विश्लेषण केल्यानंतर, आरोपीचे लोकेशन ईशान्य भारतातील आसाम आणि नागालँड राज्यांमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक आसाम व नागालँडकडे रवाना करण्यात आले. या पथकाने आसाममधील उदलगिरी आणि कारबी-आंगलाँग जिल्ह्यांसह नागालँडमधील दिमापूर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग १२ दिवस शोधमोहीम राबवली. अखेर १२ मे २०२६ रोजी पोलिसांना ठोस माहिती मिळाली आणि त्यांनी आसामच्या उदलगिरी जिल्ह्यातील चुंगाबुध परिसरातून संबंधित आरोपीला शोधून काढले. चौकशीअंती तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आले. अतिशय दुर्गम भागात आणि भाषेची अडचण असूनही, जलालखेडा पोलिसांनी चिकाटीने हा तपास पूर्ण केला आणि केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर हा गुन्हा उघडकीस आणला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *