Headlines

राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार:महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला! पक्ष एकत्रीकरणाचा विषय आम्ही बाजूला ठेवलाय- रोहित पवार




उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य बनत चालले असून, राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे, महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. ‘शक्ती कायद्या’ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी 31,141 गायब झालेल्या मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रोहित पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित येण्याचा विषय अजित पवार असताना चर्चेत होता. मात्र आता आमच्याकडून तो विषय पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या पक्षात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींवर बोट ठेवत, त्यांच्या पक्षात सध्या काहीही व्यवस्थित सुरू नाही, अशी थेट टीकाही रोहित पवारांनी केली. महाराष्ट्रात तासाला एका महिलेवर अत्याचार रोहित पवार म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याची नोंद सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी घेतली पाहिजे. या प्रकरणांमध्ये राजकारण करू नये, कारण मी सुद्धा एका मुलीचा वडील आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिलासाठी असलेले धोरण आपल्याला माहिती आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना झाल्या त्यामुळे मन सुन्न होते. या सर्व प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रात तासाला एका महिलेवर अत्याचार होतो. गायब झालेल्या मुली गेल्या कोठे? रोहित पवार म्हणाले की, मुंबईत सुद्धा महिला सुरक्षित दिसून येत नाही. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मुली गायब होतात त्या जातात कोठे या बद्दल काही माहिती मिळत नाही. 31141 मुलींचे झाले काय? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. युपीनंतर महिला महाराष्ट्रात असुरक्षित आहेत असा अहवाल आहे. महिला अपहरणाच्या विषयात महराष्ट्र देशात पहिला आहे. शक्ती कायदा पास करा रोहित पवार म्हणाले की, अत्याचाराच्या घटनेत फास्टट्रॅक कोर्टात खरच न्याय मिळतो का? पीडितेच्या कुटुंबियांना खरच न्याय मिळाला पाहिजे. शक्ति कायद्यात 30 दिवसांत चार्जशिट, 30 दिवसांत सुनावणी पूर्ण आणि त्यानंतर शिक्षा होते. शक्ति कायद्यात फक्त महिलांसाठी कोर्टची तरतूद आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोर्टची स्थापन झाली आहे. शक्ती कायदा देशाला दिशा देणारा कायदा असून त्याची अंमलबजावनी व्हावी, असेही रोहित पवार म्हणाले. तटकरे-पटेलांचे पवारांसोबत जुने संबंध रोहित पवार म्हणाले की, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षांचे जुने संबंध आहेत. नुकतीच सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. केवळ तटकरेच नाही, तर प्रफुल पटेल देखील शरद पवारांना भेटून आले आहेत. ज्या प्रकारे अजित पवारांच्या पक्षात घडामोडी घडत आहेत, त्यावरून तिथे काही आलबेल नाही हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, तो त्यांचा अंतर्गत विषय असून त्यांना त्यांचा पक्ष कसा चालवायचा, हा त्यांचा प्रश्न आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *