Headlines

शासकीय आदेश निघूनही वाळू वाहतूक ठप्प; प्रशासनाचा सावळा गोंधळ कायम:डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा डेपोचे लाखो रुपये भरूनही गाड्या बंदच‎




प्रतिनिधी | वैजापूर तालुक्यात सध्या टेंडर शिल्लक वाळूचे, पण नजर मात्र गोदावरीच्या नव्या वाळूवर. अशी एकच चर्चा रंगू लागली आहे. तालुक्यातील डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा येथील वाळू डेपोचे टेंडर पूर्ण झाले. ठेकेदारांनी लाखोंची चलने भरली. शासनाचे आदेशही निघाले. वाहतुकीची तारीखही निश्चित झाली. मात्र, एवढी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष वाळू वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे सगळे काही क्लिअर असताना हा गोलमाल नेमका कशासाठी? असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. गोदावरी काठावरील या डेपोच्या आड नदीपात्रातून नव्या वाळूचा अवैध उपसा करण्याचा कट आखला गेल्याची चर्चा आहे. कारण वाळूचा हा खेळ फक्त जुन्या शिल्लक स्टॉकपुरता मर्यादित नसून, नदीपात्रातील नव्या मालापर्यंत ही साखळी पोहोचल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासमोर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीची पोलखोल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक महसूल यंत्रणेची जी खरडपट्टी काढली, त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. गोदावरीकाठावरील वाळू डेपोभोवती मोठे आर्थिक गणित फिरत आहे. उपसा, वाहतूक, चलन ते प्रोटेक्शन. अशा प्रत्येक टप्प्यावर साखळी सक्रिय असल्याचे बोलले जात असले, तरी सध्या अंतिम होकारावरच काम अडकले आहे. कारण पुढे काही गडबड झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली, तर संपूर्ण साखळी उघडी पडू शकते. याची धास्ती अधिकाऱ्यांना लागली आहे. कमाई सगळ्यांना हवी, पण उद्या कारवाई झाली तर कोणाला पुढे करायचे? हाच आता गोदावरीकाठावरील खरा कळीचा मुद्दा बनला आहे. मार्चमध्ये लिलाव, मे उजाडला तरी गाड्या बंदच माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे १५०३.३१ ब्रास तर बाभुळगावगंगा येथे २८१५.७६ ब्रास शिल्लक वाळू साठ्याच्या लिलावासाठी प्रशासनाने मार्च महिन्यात जाहीर प्रकटन काढले होते. २७ मार्च २०२६ रोजी दोन्ही डेपोची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. डागपिंपळगाव डेपो, ९ लाख ५३ हजार ८५० रुपयांच्या मूळ किमतीवर तब्बल २१ लाख ३० हजार ९९२ रुपयांची सर्वोच्च बोली लागली. बाभुळगावगंगा डेपो, या डेपोसाठीही ठेकेदारांनी लाखोंची बोली लावली. ठेकेदारांनी शासनाच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा केल्यानंतर प्रशासनाने ४ मे २०२६ पासून वाळू वाहतुकीचे अधिकृत आदेश जारी केले होते. मात्र, आदेश निघून दोन आठवडे उलटले तरी प्रत्यक्षात अद्याप एकही अधिकृत वाहन सुरू झालेले नाही. Ãसंबंधित डेपोबाबत शासनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, प्रशासनाचे आदेश असूनही वाळूची वाहतूक अद्याप का सुरू झाली नाही, याबाबत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयाकडून अधिकृत माहिती घेऊनच मी सविस्तर सांगू शकेन. – सूरज कुमावत, नायब तहसीलदार तथा गौण खनिज विभाग प्रमुख, वैजापूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *