Headlines

कांदा प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन; हजारो शिवसैनिक रस्त्यावर




राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मोठे चक्काजाम आंदोलन करत शिवसैनिकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक 19, जांबरगाव येथे हजारो शिवसैनिकांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, समृद्धी महामार्ग रोखून आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात कांद्याला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून सरकारला इशारा दिला. आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनावेळी अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी जगला तरच राज्याची अर्थव्यवस्था मजबूत राहील. मात्र आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून सरकार फक्त आश्वासनांपुरते मर्यादित राहिले आहे, असे दानवे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या शिवसेनेने आंदोलनादरम्यान सरकारसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा आणि प्रत्येक क्विंटलमागे पंधराशे रुपयांचे अनुदान जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवण्याची मागणीही करण्यात आली. खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, कांदा चाळ उभारणीसाठी 75 टक्के अनुदान द्यावे आणि दर्जेदार कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावे, अशाही मागण्या शिवसेनेकडून करण्यात आल्या. राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता या आंदोलनामुळे राज्यातील कांदा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. समृद्धी महामार्गावर झालेल्या या ऐतिहासिक चक्काजाम आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढल्याचे मानले जात आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरून येत्या काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *