![]()
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसीबी) निवडणूक प्रक्रियेत राजकीय वातावरण तापले असतानाच विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी सोमवारी (18 मे) अत्यंत निकाल दिला आहे. बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर घेण्यात आलेल्या एकूण 47 आक्षेपांपैकी 25 आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. 22 आक्षेप मान्य करण्यात आले आहेत. या निकालामुळे मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील 4 बड्या आमदारांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचा मार्गही मोकळा झाला आहे. आता 21 मे रोजी बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. यामध्ये मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार अनुराधा चव्हाण, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्याविरुद्धचे आक्षेप फेटाळले. आमदारांना मिळाला दिलासा विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांच्यासमोर या सर्व आक्षेपांवर सविस्तर सुनावणी झाली. या सुनावणीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये मंत्री, आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रारूप मतदार यादीवरील आक्षेपांचा निकाल लागल्यामुळे आता जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत विकास सोसायटीचे 689, बिगर शेतीचे 352, पणन प्रक्रियेचे 90, वैयक्तिक मतदारसंघाचे 80 याप्रमाणे मतदार होते. आता आक्षेप मान्य झाल्यामुळे मतदार संख्येत 22 ने घट होणार आहे. बँकेची अंतिम मतदार यादी येत्या गुरुवारी, 21 मे रोजी अधिकृतपणे जाहीर केली जाईल. ‘त्या’ 22 ठरावांचा गेम नेमका कुणी उलटवला प्रारूप यादीत एकूण मतदारांची संख्या बऱ्यापैकी होती. मात्र ज्या 22 संस्थांचे किंवा व्यक्तींचे आक्षेप मान्य करण्यात आले आहेत, त्यांची नावे अंतिम यादीतून कट होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठराव देण्याची मुदत संपल्यानंतर घाईघाईत दाखल करण्यात आलेले काही ठराव, अपूर्ण कागदपत्रे यामुळे ही 22 मते बाद झाली आहेत. ही 22 मते कोणत्या पॅनलची किंवा गटाची कमी झाली, यावरच आता अंतिम निवडणुकीतील जय-पराजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
Source link
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक, 22 मतदारांची नावे कट:मंत्री सावेंसह 4 आमदारांना दिलासा मिळाला