Headlines

विधानसभा अध्यक्षांच्या प्रस्तावाला बेस्ट कमिटीचा जोरदार विरोध:गेट वे ऑफ इंडिया जवळील 'बेस्ट' थांबा हलवण्यास समितीचा नकार




दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसथांबा स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने ब्रेक लावला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार, हा बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर हलवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. मात्र, सदस्यांनी यावर कडाडून टीका करत हा प्रस्ताव प्रशासनाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवून दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ११ मार्च २०२६ रोजी बेस्ट प्रशासनाला एक पत्र पाठवले होते. गेट वे ऑफ इंडिया परिसरात देश-विदेशातील पर्यटकांची प्रचंड रेलचेल असते. वाहने आणि पादचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. सद्यस्थितीत असलेल्या बेस्ट बसथांब्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडत असून, स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेऊन, गेट वे ऑफ इंडिया येथील बेस्टचा मार्ग बदलावा आणि हा थांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोरील योग्य जागेवर स्थलांतरित करावा, अशी शिफारस नार्वेकर यांनी केली होती. समिती सदस्यांचा संताप: “हा प्रवाशांवर अन्याय” विधानसभा अध्यक्षांच्या पत्राचा आदर राखत बेस्ट प्रशासनाने या स्थलांतराचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवला. मात्र, या प्रस्तावावर बैठकीत तीव्र पडसाद उमटले. समितीच्या सदस्यांनी थेट आरोप केला की, हा प्रस्ताव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला दुय्यम स्थान देऊन खासगी गाड्या आणि टॅक्सीचालकांना मोकळे रान करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. पर्यटकांच्या आणि सामान्य चाकरमान्यांच्या हक्काची बस सेवा दूर नेल्यास, प्रवाशांना नाहक पायपीट करावी लागेल. ‘बेस्ट’ ही सर्वसामान्यांची वाहिनी आहे, त्यामुळे अशा व्यावसायिक किंवा व्हीआयपी दबावापोटी प्रवाशांचे हित धोक्यात आणता येणार नाही, असे सांगत समितीने हा प्रस्ताव नामंजूर केला. प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे परत बेस्ट समितीने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेवरून तयार झालेल्या या प्रस्तावाला सध्या तरी मंजुरी मिळालेली नाही. प्रवाशांच्या हिताचा आणि सुलभतेचा पुन्हा एकदा सखोल अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा, या अटीसह समितीने हा मसुदा प्रशासनाकडे पुनर्विचारासाठी सुपूर्द केला आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्टचा बसथांबा तूर्तास तरी त्याच ठिकाणी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *