![]()
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या ‘टीम स्कायट्रेक’ने ‘प्रोजेक्ट गरुडा’ अंतर्गत भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या विकसित केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. हे विमान ९.२५ मीटर विंगस्पॅन आणि २६१ किलो वजनाचे असून, भारतात तयार झालेले अशा प्रकारचे हे पहिलेच विमान आहे. याची पेलोड क्षमता १०० किलो असून ते ताशी ८० किमी वेगाने उडू शकते. यासाठी लि-पो २२० एएच बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग ॲस्पिरंट्स’ मार्फत तब्बल ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. दोन वेळा अपयश आल्यानंतरही विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. एरोडायनॅमिक्स, स्ट्रक्चरल डिझाईन आणि सिस्टिमॅटिक टेस्टिंगमध्ये सुधारणा करत, अखेर ४ मे २०२६ रोजी धुळे येथील धावपट्टीवर या विमानाने यशस्वी टेक-ऑफ आणि सुरक्षित लँडिंग केले. विद्यार्थ्यांनी विमानाची रचना, फ्लाइट कंट्रोलर प्रणाली आणि नेव्हिगेशन यंत्रणा स्वतः विकसित केली आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला गेला. या यशाबद्दल बोलताना डॉ. कराड म्हणाले, “प्रोजेक्ट गरुडा हे अनुभवाधारित शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे. अशा प्रकल्पांमुळे देशात भावी एरोस्पेस तज्ज्ञ घडतील.” या प्रकल्पाला पद्मश्री शीतल महाजन आणि कॅप्टन अमोल यादव यांचेही प्रोत्साहन लाभले. भविष्यात ही टीम ‘इलेक्ट्रिक एअर टॅक्सी’ आणि संरक्षण क्षेत्रासाठी ‘स्वॉर्म-ड्रोन मदरशिप’ विकसित करण्याच्या दिशेने काम करणार आहे.
Source link
MIT एडीटीने विकसित केले देशातील सर्वात मोठे आरसी विमान:९.२५ मीटर विंगस्पॅन, २६१ किलो वजन; रेकॉर्ड बुकमध्ये नोंद