![]()
राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, मात्र जे राज्य चालवत आहेत, त्यांच्याकडे तिजोरीच्या लुटीतून आलेली प्रचंड संपत्ती आहे. सर्वात जास्त पैसा भाजप आणि शिंदे गटाकडे आहे. हा पैसा कुठून आणि कसा आला, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केल्यास राज्याचे कर्ज आपोआप कमी होईल. एवढेच नव्हे, तर कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात, असा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्यात दुष्काळामुळे कोणी मरो किंवा जगलो, याशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना काहीही देणेघेणे राहिलेले नाही. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा थाटमाट पाहिला, तर खरोखरच या राज्यावर 11 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे का, असा प्रश्न पडतो. केवळ गरिबांना रोजीरोटी मिळू द्यायची नाही, असे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्र्यांच्या नावावर संस्था उभारायची असेल, तर महाराष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी कष्ट घेतले, त्यांचे ते सगळे प्रयत्न वाया गेले आहेत. महाराष्ट्रात गंभीर पाणीटंचाई संजय राऊत म्हणाले की, सध्या राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती असून, आतापासूनच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागासह पुणे आणि मुंबईत पुढील 2 ते 4 महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री मोठमोठ्या घोषणा करून राज्य उत्तम चालल्याचा देखावा करत आहेत; परंतु त्यांना राज्यातील आर्थिक लूट अजूनही थांबवता आलेली नाही. विकास कामांच्या नावाखाली ठेकेदारांकडून कामे करून घेतली, मात्र सरकार त्यांना 95 हजार कोटी रुपयांची थकबाकी देऊ शकले नाही, ज्यामुळे ठेकेदार आत्महत्या करत आहेत. राज्यावर 11 लाख कोटींचे कर्ज असताना या भीषण दुष्काळाचा सामना कसा करणार? असा सवाल त्यांनी केला. निवडणुकांमध्ये पैशांची उधळण संजय राऊत म्हणाले की, राज्यात पडलेल्या दुष्काळाशी सामना करण्यासाठी किमान 50 हजार कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडावर सध्या मुख्यमंत्र्यांनी केवळ 5 हजार रुपयांची मदत फेकली आहे. या राज्यकर्त्यांकडे निवडणुका लढवण्यासाठी लागणारा अतिरिक्त पैसा प्रचंड प्रमाणावर आहे. भाजप, शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे भरपूर पैसा आहे. सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पॅनलने तब्बल 30 कोटी रुपये खर्च केले असा दावा करत राऊत म्हणाले की, जर एका कारखान्याच्या निवडणुकीत 25 ते 30 कोटी खर्च होत असतील, तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना अर्धा-अर्धा तोळ्याचे सोन्याचे दागिने, सफारी सूट आणि पैठण्या वाटल्या जात आहेत. पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप सुरू आहे, मग राज्य गरीब आहे असे कसे म्हणता येईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठेकेदारांच्या माध्यमातून लूट संजय राऊत म्हणाले की, काल एका पक्षाचे माजी आमदार नाचत असताना त्यांच्यावर पैशांची उधळण केली जात होती. 50 खोके एकदम ओके ही घोषणा देणारे नेते आता भाजपमध्ये गेले असून, ते डान्सबारसारखी मस्ती करत आहेत. त्यांच्यावर 5 ते 25 लाख रुपयांची उधळण करण्यात आली आहे. सत्ताधारी आमदार आणि खासदारांनी ठेकेदारांच्या मदतीने हे राज्य लुटले आहे, पण ठेकेदारांचे पैसे मात्र अद्याप दिले नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरात चूल पेटत नाही आणि तुम्ही त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करता का? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी विचारला.
Source link
दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत फेकून मारली, पण निवडणुकांवर लाखांची उधळण:कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी1 लाख कोटी मिळतील- संजय राऊत