![]()
विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीची संधी देणारे, त्यांच्या विचारांना नवी दिशा प्रदान करणारे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे अभ्यास मंडळ हे विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. कोलते यांनी केले. स्थानिक नूतन विदर्भ शिक्षण मंडळाद्वारे संचालित महिला महाविद्यालय, जोग चौक, अमरावती येथे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या भाषा विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिभाषिक अभ्यास मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थिनींमध्ये भाषिक अभिव्यक्ती, साहित्यिक अभिरुची आणि सर्जनशीलता विकसित करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुलदीपसिंह मोहाडीकर होते. तर उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. प्रणव कोलते उपस्थित होते. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. जयवंत पराते, मराठी विभागप्रमुख प्रा. चेतन यावलीकर आणि संस्कृत विभागप्रमुख प्रा. अश्विनी पिंपळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते तिन्ही भाषा विभागांच्या अभ्यास मंडळांच्या फलकांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. कोलते म्हणाले की, भाषा आणि साहित्याच्या सहवासातून व्यक्तिमत्त्व समृद्ध होत असते. वाचन, चिंतन, लेखन आणि संवाद या प्रक्रियांमुळे व्यक्तीच्या विचारविश्वाला व्यापकता प्राप्त होते, तर अभिव्यक्ती अधिक प्रभावी बनते. अभ्यास मंडळ हे केवळ शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणारे माध्यम नसून विद्यार्थिनींना स्वतःतील कलागुण ओळखण्याची, विचार मांडण्याची आणि सर्जनशीलतेला वाव देण्याची संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ आहे. अभ्यास मंडळाच्या माध्यमातून साहित्यिक चर्चा, काव्यवाचन, कथाकथन, वक्तृत्व, निबंधलेखन, अनुवाद, साहित्यिक व्यक्तिमत्त्वांचा परिचय आणि विविध भाषिक स्पर्धा आयोजित करता येतील. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या प्रतिभेला वाव मिळून त्यांच्यातील आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्ये विकसित होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा. जयवंत पराते यांनी केले. विद्यार्थिनींच्या भाषिक कौशल्यांना चालना त्रिभाषिक अभ्यास मंडळाच्या माध्यमातून इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या भाषांच्या समृद्ध साहित्यपरंपरांचा परिचय करून देण्यासोबतच विद्यार्थिनींच्या भाषिक कौशल्यांना आणि सर्जनशील अभिव्यक्तीला चालना देणारे विविध उपक्रम राबवण्याची दिशा यावेळी स्पष्ट करण्यात आली. इंग्रजी विभागाच्या माध्यमातून वक्तृत्व, वादविवाद, सर्जनशील लेखन, पुस्तक परीक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासपर उपक्रम; मराठी विभागाच्या वतीने काव्यसंमेलन, कथाकथन, साहित्यिकांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित ्त विशेष कार्यक्रम, बोलीभाषा संवर्धन, मराठी भाषा गौरव दिन आणि लेखन कार्यशाळा; तर संस्कृत विभागाच्या माध्यमातून श्लोकपठण, सुभाषितांचे सादरीकरण, संस्कृत संभाषण, नाट्यवाचन, भगवद्गीतेतील निवडक श्लोकांचे विवेचन आणि संस्कृत साहित्याचा परिचय असे विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत यावेळी विचार मांडण्यात आले आहे.
Source link
महिला महाविद्यालयात अभ्यास मंडळाचे उद्घाटन:अभ्यास मंडळ म्हणजेच विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ- प्रा. डॉ. कोलते