![]()
शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून, डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन व निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत उभे केलेले पीक क्षणात नष्ट झाले, तर त्या बळीराजाच्या मनावर काय आघात होतो? वर्षभराच्या कष्टाचे फळ डोळ्यांदेखत मातीत मिसळल्याने जगायचे तरी कोणाच्या भरवशावर, असा प्रश्न अकोट तालुक्यातील कवठा बु. येथील एका घटनेने उपस्थित केला आहे. गावातील शेतकरी रामेश्वर मरकाळे यांच्या शेतातील फुलोऱ्यात आलेले कपाशीचे पीक अज्ञात व्यक्तीने उपटून उद्ध्वस्त केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकरी रामेश्वर मरकाळे यांनी यंदाच्या खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाच्या आशेने शेतात मोठ्या कष्टाने कपाशीची लागवड केली होती. शेतीकामांचा वाढता खर्च भागवण्यासाठी त्यांनी बँकेचे व खासगी कर्ज काढले होते. नियमित मशागत, वेळेवर खते, कीटकनाशकांची महागडी फवारणी आणि दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी हे पीक जोपासले. हळूहळू पीक बहरले, झाडांना फुलोरा आला आणि कष्टाचे चीज होईल, अशी आशा निर्माण झाली. या उत्पादनातून कर्जाची परतफेड करता येईल, कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालेल, असे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, एका रात्रीत अज्ञात समाजकंटकाने केलेल्या कृत्यामुळे ही संपूर्ण आशा धुळीस मिळाली. अंदाजे एक एकर क्षेत्रातील कपाशीचे उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आधीच निसर्गाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च व हमीभावाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत एखाद्याशी वैर किंवा वैयक्तिक वाद असला तरी त्याचा राग पिकावर काढणे, दुसऱ्याच्या उपजीविकेची राखरांगोळी करणे अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेची माहिती मिळताच कवठा बु. येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सखोल तपास करावा. तसेच समाजकंटकाला अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे घटनास्थळाचा पंचनामा करत झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करावे, नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर मरकाळे यांना शासकीय आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. कायद्यात काय आहे तरतूद? भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४ (कुचेष्टा) नुसार दुसऱ्याच्या शेतातील पिकाची नासधूस करणे, झाडे उपटून टाकणे किंवा जनावरे सोडून नुकसान करणे हा दंडनीय गुन्हा आहे. गुन्ह्याचे स्वरूप व नुकसानीच्या मूल्यावर आधारित आरोपीविरुद्ध मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, यात कारावास व आर्थिक दंडाची तरतूद आहे. याप्रकरणी डायल ११२ किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवावी. घामाला किंमत मिळायला हवी ^एका एकरातील कापूस पीक उद्ध्वस्त होणे ही केवळ शेतीच्या नुकसानीची बाब नाही, तर एका शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक भविष्यावर झालेला आघात आहे. शेतकऱ्याच्या घामाला किंमत मिळावी, त्याच्या कष्टाचे संरक्षण व्हावे, अशा प्रकारच्या कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. – रामेश्वर मरकाळे, शेतकरी, कवठा बु.
Source link
कवठा येथे अज्ञाताने एकरातील कपाशी टाकली उपटून:फुलोऱ्यात आलेले उभे पीक केले उद्ध्वस्त; संतापाची लाट, आरोपीवर कारवाईची मागणी