![]()
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या (स्वायत्त) शिक्षिका मनीषा मांढरे यांचे नाव समोर आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासन आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने मनीषा मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. संस्थेने माध्यमांना एक पत्रक जारी करत या कारवाईची माहिती दिली. तसेच संस्थेची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणातील कथित सहभागावरून मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली होती. महाविद्यालयाची प्रतिमा जपण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांच्या सूचनेनुसार मनीषा मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नुसार, शनिवार, १६ मे २०२६ पासून मनीषा मांढरे यांना महाविद्यालयीन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एकाच्या चुकीसाठी सर्वांना दोषी धरणे चुकीचे या संदर्भात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मात्र, एखाद्या कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर केलेल्या चुकीच्या कृत्यासाठी संपूर्ण संस्था, प्राचार्य, इतर शिक्षक आणि हजारो विद्यार्थ्यांना दोषी धरणे किंवा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. संस्थेने याला “चोर सोडून संन्याशाला फाशी” देण्यासारखा प्रकार म्हटले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९३४ मध्ये पाच शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या हेतूने केली होती. आज या संस्थेत ४,५०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले जात आहे. अशा परिस्थितीत, केवळ एका व्यक्तीच्या कृत्यामुळे दलित, आदिवासी आणि गरीब कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या मोठ्या शैक्षणिक कुटुंबाची विनाकारण बदनामी करू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. संस्थेचे सचिव प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी या प्रकरणात पारदर्शक भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रसारमाध्यमांनी देखील वस्तुस्थिती लक्षात घेऊन निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ वार्तांकन करावे, जेणेकरून निष्पाप संस्था आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी भावना कर्मचारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची अपेक्षा असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
Source link
मनीषा मांढरेंवर निलंबनाची कारवाई:नीट 'बायोलॉजी'चा पेपर फोडल्याचा ठपका; पुण्यातील मॉडर्न कॉलेजची कडक कारवाई