![]()
जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेला इंधन आणि गॅसचा तुटवडा आता थेट भारताच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असून, याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात उमटू लागले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन करत परदेशी पर्यटन आणि सोने खरेदी टाळण्याचे संकेत दिल्यानंतर, स्थानिक पातळीवर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झालेली वाढ आणि तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेल्या १५ दिवसांपासून वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत आहे. नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोर दहेगाव परिसरातील गोळवाडी येथील साई संकेत पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. डिझेल मिळवण्यासाठी पहाटेपासूनच शेतकरी आणि वाहनधारकांनी मैलोन्मैल लांब रांगा लावल्या होत्या. भर उन्हात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत लोक हातात कॅन घेऊन डिझेलच्या प्रतीक्षेत उभे होते. वाढती गर्दी पाहून पंप चालक संकेत पाटील मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्वांना सम प्रमाणात इंधन वाटप करून परिस्थिती हाताळली. शेतीची कामे रखडली; बळीराजा हवालदिल सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामापूर्वीची मशागत आणि नांगरणीची कामे वेगाने सुरू आहेत. ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही कामे करण्यासाठी डिझेलची मोठी मागणी आहे. मात्र, वैजापूर ते लासूर स्टेशन दरम्यान असलेल्या ९ ते १० पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा अत्यंत मर्यादित असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. इंधनासाठी शेतकऱ्यांना दोन-तीन दिवस भटकंती करावी लागत आहे. डिझेलसाठी वणवण भटकावे लागतेय ऐन शेतीची पूर्व मशागतीची कामे करायची वेळ आहे. अशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासू लागला व त्यात भर म्हणून डिझेल व पेट्रोलचे दर पण वाढले आहे. पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहे. तर काही वेळा दोन-तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. सर्व पेट्रोल पंपावर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शेतीचे काम खोलांबळी आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकरी गोविद डिके यांनी दिली. डिझेलची मागणी वाढली, काही तासांत स्टॉक संपतो पेट्रोल पंपचालक संकेत पाटील मिसाळ म्हणाले, आम्ही दिवसाआड आमच्या पेट्रोल पंपावर डिझेलचे टँकर उपलब्ध करत आहोत. पण डिझेलची विक्रमी मागणी वाढलेली असून, मनमाड येथून आलेले टँकर काही तासात खाली होत आहे. आम्ही नियोजन करून सर्व वाहनधारक व शेतकरी यांना सम प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे वाटप करत आहोत. तरी पण पेट्रोल-डिझेलचा तुतवाडा जाणवत आहे. प्रशासनाकडून नियोजनाची गरज डिझेलची टंचाई केवळ वैजापूरपुरती मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. आगामी पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामे पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने इंधन कोटा वाढवून देण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.
Source link
वैजापूर तालुक्यात डिझेल-पेट्रोलची टंचाई:टँकर आल्यावर काही तासांतच संपतो स्टॉक; पंपांवर कॅन घेऊन शेतकऱ्यांची गर्दी, भर उन्हात रांगा