Headlines

पुणे क्राईम जगत:हज यात्रेच्या नावाखाली 21 लाखांची फसवणूक, ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल; मोलकरणीकडून घरातच चोरी




पुणे शहरात स्वस्त दरात हज आणि उमरा यात्रेचे आमिष दाखवून ७० ते ८० गुंतवणूकदारांची २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या तीन मालकांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेहजाद मोहम्मद इस्लाम शेख (वय ३४, रा. कोंढवा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. अमीर सरदार शेख (वय ३८), मिस्बा अमीर शेख (वय ३५) आणि रसाबीर रियाज शेख (वय ३८) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी ‘अलखली टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ या कंपनीमार्फत हज आणि उमरा यात्रेसाठी आकर्षक जाहिराती केल्या होत्या. १९ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत त्यांनी ७० ते ८० नागरिकांकडून यात्रेसाठी आगाऊ रक्कम जमा केली. मात्र, ठरल्याप्रमाणे यात्रा घडवून आणली नाही किंवा जमा केलेले पैसेही परत केले नाहीत. अशा प्रकारे त्यांनी एकूण २१ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आईस्क्रीम कंपनीची फ्रँचायझीचे आमिष दाखवून गंडा दरम्यान, पुणे शहरात आणखी एका फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका नामांकित आईस्क्रीम कंपनीची फ्रँचायझी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ८ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. राहुल प्रदीप भोसले (वय ३७, रा. मांजरी बुद्रुक) यांनी याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू शर्मा, तरुण गुप्ता आणि इतर काही बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राहुल भोसले यांनी आईस्क्रीम व्यवसायासाठी ऑनलाईन फॉर्म भरला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांना फ्रँचायझी देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी नोंदणी शुल्क आणि साहित्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. १५ मे २०२५ ते २७ जून २०२५ या कालावधीत आरोपींनी भोसले यांच्याकडून ८ लाख ३५ हजार रुपये उकळले. मात्र, फ्रँचायझी न देता त्यांची फसवणूक केली. मोलकरणीकडून घरातच चोरी तिसऱ्या एका घटनेत, वाघोली येथे घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच मालकाच्या घरातून ५ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. लीना राजन मांढरे (वय ६३, रा. वाघोली) यांनी याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कल्पना हाथगले या घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली. आरोपी कल्पना ही फिर्यादीच्या घरी घरकाम करत होती. तिने बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने मालकाच्या परवानगीशिवाय चोरून नेले. फिर्यादीने दागिने तपासले असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *