![]()
पुण्यात सोन्याच्या दागिन्यांवर कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. कर्वेनगर भागात एका ग्राहकाचे दागिने ताब्यात घेऊन आरोपीने ते परस्पर दुसऱ्या कंपनीत तारण ठेवले. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद शरद पवार (वय ४६, रा. वारजे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोहसीन मंजुरेआलम पठाण (वय ३३, रा. कराड, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कर्वेनगरमधील ‘मॅग फिन सर्व्ह’ कंपनीत घडली. आरोपी पठाणने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्याने १७० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर कमी व्याजदराने १२ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, त्याने हे दागिने फिर्यादीकडून घेतले आणि ते परस्पर दुसऱ्या एका फायनान्स कंपनीत तारण ठेवले. फिर्यादीने कर्जाची रक्कम भरून आपले दागिने परत मागितले असता, आरोपीने टाळाटाळ केली. अखेर, १८ लाख रुपये किमतीच्या या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचे समोर आले. प्लॉट देण्याच्या बहाण्याने फसवणूक दरम्यान, शहरात फसवणुकीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. प्लॉट देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सचिन आण्णासाहेब पेटारे (वय ३५, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अविष्कार लवटे, अनिल लवटे आणि प्रेम पोलकेवार (सर्व रा. मे अनिल कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपर्स, कात्रज, पुणे) या तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२२ पासून हा व्यवहार सुरू होता. आरोपींनी फिर्यादीला एक गुंठा जागा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि ६ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना जागा दिली नाही. आरोपींनी केवळ २ लाख १५ हजार रुपये परत केले. उर्वरित ४ लाख ३५ हजार रुपये आजवर परत न देता आरोपींनी संगनमताने फिर्यादीची फसवणूक केली.
Source link
पुण्यात सोन्याच्या दागिन्यांवर 18 लाखांचा अपहार:कमी व्याजाचे आमिष दाखवून आरोपीने दागिने परस्पर ठेवले तारण, गुन्हा दाखल